मंगळवार, २२ जानेवारी, २०१३

मळभ


पुढचे काहीच दिसत नसतांना धुक्यातून चालायची एक वेगळीच मज्जा आहे. आपल्या नकळत आपण आयुष्यात देखील बरेचदा असे अंदाजाने चालत असतो. पुढचे दिसत नसते पण रस्ता ओळखीचा असला कि मनातून एक विश्वास असतो कि इच्छित स्थळी नक्की पोचू आपण, अन एक आशाही असते कि हे धुके सरेल. कधी कधी बराच काळ धुकं काही सरत नाही त्यावेळी ते धुके आहे कि मळभ हे ओळखता आले पाहिजे.  या मळभाची सवय होऊ देता कामा नये, नाहीतर आभाळाचा निळा रंग करड्यात मिसळायला वेळ लागत नाही मग आयुष्यातला करडा रंग हळू हळू गहिरा होऊ लागतो. 

धुकं आणि मळभ यातील फरक ओळखण्याकरीता लख्ख सूर्य प्रकाशाची गरज असते. 


बरेचदा आपण धुक्याला पाहून मळभ मळभ असे म्हणून ओरडतो अन हातपाय गाळून बसतो.  तुमच्या आयुष्यातला सूर्य तुम्हालाच शोधायचा असतो. एकदा का तो सापडला कि धुक्याची तमा बाळगू नये. मळभ दूर व्हायला मात्र एकदा तरी मनसोक्त बरसावे लागते त्याशिवाय ते सरत नाही.  त्यामुळे स्वेटर, छत्री, रेनकोट यासारखी निसर्ग-द्वेष्टि साधन वापरण्यापेक्षा मोकळे राहा, मनसोक्त भिजा उन्हातही अन पावसातही, थंडीतली थरथर काळजापर्यंत पोचुद्या ... 
कोणास ठाऊक अश्याने तुमच्या आयुष्यावरचे मळभ सरेलही कदाचित ...

सोमवार, २१ जानेवारी, २०१३

पुस्तक


आपण एखाद्या लांबच्या प्रवासाला निघालो आणि गाडीत बसलो कि राखून ठेवलेले एखादे पुस्तक काढतो वाचायला अन त्याच वेळी आपला शेजारी देखील त्याचे पुस्तक काढतो तेव्हा आपले लक्ष आपल्या पुस्तकापेक्षा त्याच्या पुस्तकात डोकावण्यात जास्त असते. 

नवरा बायकोचे पण तसेच असते काहीसे असे मला वाटते. म्हणजे दोघेही आपापली पुस्तक वाचत असतात पण दुसर्याच्या पुस्तकाबद्दल एक आकर्षण, ओढ आणि हळू हळू हक्क वाटू लागतो. आपण त्यात डोकावू लागतो, मग स्वताच्या पुस्तकामाधली पानं कधी सवयीने तर कधी दुसर्याला कळू नये म्हणून तर कधी आपोआप उलटली जातात.  संसारात खरी मज्जा तेव्हा आहे जेव्हा दोघेही एकच पुस्तक वाचाल. एकाच सुखी शेवटाच्या ओढीने ... मग आपोआपच दुसर्याचे वाचून होईपर्यंत थांबणे, एखाद्या विनोदाला दोघांनी एकत्र हसणे, एखाद्या गहीवरणाऱ्या प्रसंगी हात हातात घट्ट धरणे ह्या सगळ्याची मजा येते.

आज अनेक नवरा बायको आपापली वेगळी पुस्तके वाचत आहेत, आपापल्या गोष्टीमध्ये रममाण आहेत. मग ते मधेच खुदकन हसणे, डोळ्यांचे ओलावणे हे सगळे त्याला अनोळखीच ना ... कारण त्यावेळी तो दुसर्याच गावी ... त्याच्या त्याच्या पुस्तकात मग्न ... दोन्ही पुस्तकांचे शेवट गोड असतीलही कदाचित पण ते एकटयानेच चाखायचे यात काय सुख. त्याच्या किंवा तिच्या पुस्तकात डोकावून तर बघा आवडेल तुम्हालाही ते कदाचित. हळूहळू त्या   पुस्तकाबद्दलची ओढ कमी होण्याच्या आत तुमचे पुस्तक बदला. मग दोघांना एकाच गोष्टीची ओढ, एकसारखी हुरहूर अन दोघांची वाटचाल एकाच सुखी शेवटाकडे असेल.

बर हे पुस्तक संपले तरी दोघांकडे एकसारख्या आठवणी असतील ... चर्चेला दोघांच्या आवडीचा विषय असेल आणि यातूनच संवाद वाढेल. संवादाला लय प्राप्त झाली कि त्याचा सुसंवाद होतो. आणि यासारखे सुरेख जीवनगाणे नाही.

तेव्हा एकदा वाचून बघा एखादे पुस्तक एकत्र ... 
तुमचा लांबचा प्रवास सुखकर होईल हे नक्की ...


ता. क. - फार 'पुस्तकी' आहे पण पहिल्यांदाच असे काही लिहित असल्याने चू.भू.द्या.घ्या.

बुधवार, २ जानेवारी, २०१३

प्रतिज्ञा


प्रतिज्ञा 
--------
फेसबुक माझा देश आहे।
सगळे फेसबुकीय माझे मित्र आहेत।
माझ्या प्रोफाईलवर माझे प्रेम आहे।
माझ्या फेसबुक वरील समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या अपडेट्सचा मला अभिमान आहे।
माझे स्टेटस अपडेट्स जास्तीत जास्त जण (मुली) लाईक करतील हि पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या पालकांना , गुरुजनांना 
आणि वडीलधार्‍या माणसांना माझ्या प्रोफाईल पासून लांब ठेवीन
आणि प्रत्येकाचे पोस्ट लाइक करेन ।
माझे फेसबुक  आणि माझे फेसबुक-मित्र 
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे स्टेटस अपडेट्स आणि
त्यांचे बहुढंगी फोटो पाहण्यातच माझे
सौख्य सामावले आहे।


जय टाईमपास ! जय फेसबुक !