सोमवार, ६ जुलै, २०१५

समुद्र

एकट्याने समुद्रावर जायची भीती वाटते आताशा

पूर्वी पायाशी येउन घोळणारा तो,
आता उगाच कोरड्या झालेल्या मला भिजवेल
अन निमूट माघारी वळणाऱ्या पायांना थिजवेल …
एकट्याने समुद्रावर जायची भीती वाटते आताशा

माझ्यावर सोडलेली त्याची ती जालीम लाट,
उगाच आणलेले उसने आवसान जाताना पुसत जाणार
अन घट्ट रुतलेल्या पायांचाही पुन्हा पुन्हा तोल ढासळणार
एकट्याने समुद्रावर जायची भीती वाटते आताशा

पसरला आहे मिट्ट काळोख चहूकडे,
हल्ली सूर्याबरोबर बहुदा तो रात्रीचे तारेही गिळतो,
अन दूरवर ते लाईट हाउस अन इथे मी दोघेच रात्रभर जळतो ….
एकट्याने समुद्रावर जायची भीती वाटते आताशा

- विश्वेश