सोमवार, २८ फेब्रुवारी, २०११

मज काय भाळी उमगेना ...

रात काळी, झोप जाळी, काय भाळी उमगेना ...
नभ दाटले, भर सकाळी, काय भाळी उमगेना ... 
मज काय भाळी उमगेना ...

विरली वाणी, सरली गाणी, सुकली रातराणी उमगेना ...
जाळत जाती, खोलवर मज, तुझ्या आठवणी उमगेना ...
मज काय भाळी उमगेना ...

जुनीच वाट, जुन्याच खुणा, का छळती पुन्हा उमगेना ...
फिरवी पाठ, ओळखीची लाट, वागणूक निराळी उमगेना ...
मज काय भाळी उमगेना ...

साठवले बळ, फाडले उर, पण का? न फुटले सूर उमगेना ...
फिरोनी आलो, त्याच समेवर, का? न पडली टाळी उमगेना ...
मज काय भाळी उमगेना ...
मज काय भाळी उमगेना ...

मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०११

तुला कसली रे एवढी घाई ?


आज सकाळी नेहमीप्रमाणे घाई घाई ने आवरले आणि निघालो तेव्हा बायकोने विचारले ... 
तुला कसली रे एवढी घाई ?

निघण्याची घाई, मला जगण्याची घाई ... 
आयुष्याची पाने मला उलटायची घाई 

हसायची घाई, मला रडायची घाई ...
चार पावले चालताच मला पडायची घाई

खायची घाई, मला पिण्याची घाई ...
कोणी काही देवो, मला घेण्याची घाई

जिंकायची घाई, मला हरायची घाई ...
कुठे जातो माहित नाही, पण धावायची घाई

भेटीची घाई, मला गाठीची घाई ...
ऐन तारुण्यातच मला साठीची घाई 

सवयीची घाई, मला सवयीची घाई ...
मरणाची घाई ... मला सरणाची घाई ... मला सरणाची घाई ...