गुरुवार, १ फेब्रुवारी, २०१८

आय एम अलाईव्ह (कथा)

"माझे नाव डॉ. मिलिंद बापट आणि सध्या माझ्या अभ्यासाचा विषय आहे इरा जमेनीस वय वर्ष १५ राहणार कोथरूड पुणे महाराष्ट्र भारत. इरा जर तु हे वाचत असशील तर माझा शोध घेऊ नकोस मी कधीच संपलो असेन" इराला हे वाचून धक्काच बसला ... कोण हे डॉ बापट ? तिने हे नाव आधी कधीच ऐकले नव्हते. या डायरीचे पुढचे पान वाचायला खरं तर तिचे धाडस होत नव्हते ती पटकन तिच्या रूम मध्ये गेली दार आतून लावून घेतले, मोठ्याने स्पीकरवर गाणे लावले आणि आपल्या स्टडी टेबल वर बसली. १५ मिनिटांपूर्वी इराच्या नावाने कुरियर आले होते ते आईने इराला दिले त्यात एक डायरी होती, तिला वरून नवे कोरे कव्हर होते परंतु इराने आत बघितले तर पानं बरीच जुनी होती. सगळं बळ एकवटून ती पुढे वाचू लागली
१४ सप्टेंबर २०७१ ... इरा नकळतच भूतकाळात गेली ... 

त्या दिवशी इराला हे असं सगळ्यांशी खोटं बोलणं सहन नव्हते होत, शेवटी तिने तिच्या जिवलग मैत्रिणीला राधाला सांगितलेच "हो आहे मी नॅचरल, साधी ! तुमच्यासारखी डिझायनर नाही ! पण म्हणून मी फ्रेंड म्हणून कधी कमी पडले का ? तूच सांग" राधा आधी तर शॉक मध्ये गेली, तिला कसे रिऍक्ट व्हावे हेच कळेना, हि खरंच नॅचरल असेल ? म्हणजे कुठले आईबाप अशी नॅचरली पोरं जन्माला घालतात ? धिस इस सो २०२० ! आता २०७० मध्ये असे कोण करते ? पटकन राधा पावले मागे सरकली. इराने हातात घेतलेला हात तिने सोडवला आणि कृत्रिम हसतच तिने विचारले "यु आर जोकिंग राईट ? कम ऑन इरा धिस इस नॉट फनी. उगाच काहीतरी बोलू नकोस. हा हा टॅग कसा काय मग ?" इराने पटकन आपल्या मानेवर मागच्या बाजूला असलेला टॅटू सारखा दिसणारा बार कोड नखाने खरवडून काढला. ते पाहून मात्र राधा हादरते आणि तिथून निघून जाते. इरा फक्त राधा राधा एक माझे ... एवढे ओरडत राहिली. 

डायरीत ह्या दिवशी फक्त "सीझ राधा मालवणकर ... " इतकेच लिहिले होते ... बापरे म्हणजे ... आता मात्र इराला दरदरून घाम फुटला होता, म्हणजे माझ्यामुळे राधाला ह्या लोकांनी? ... नाही नाही नंतर अनेक वेळा ती फेसबुक वर ऑनलाईन होती स्टेटस टाकत होती इन्स्टा वर तिचे फोटो पण होते ... मग ? सीझ म्हणजे काय ? 

तिने पटापट डायरीची पाने उलटली १२ ऑक्टोबर पर्यंत त्याच्यात फक्त हिंदी जुनी पुराणी शतकांपूर्वीची कोणीतरी किशोर आशा वगैरे गायकांची गाणी लिहिली होती आणि त्याची नोटेशन्स होती 

१२ ऑक्टोबर २०७१ 
"सीझ इरा जमेनीस" आणि पुढे दुसऱ्या पेनने खरवडून घाई घाईत "PTO पेज नं १२४" इतकेच लिहिले होते ... म्हणजे? आज तर २० नोव्हेंबर आहे १२ ऑक्टोबरला तर असे काही झालेच नाही? इराने पटकन पेज १२४ काढले तर तिथे पुढची काही पाने खरवडून त्यात एक छोटासा कप्पा करून एक किल्ली ठेवलेली होती. हि किल्ली इराच्या ओळखीची होती. तिच्या शाळेतल्या लॉकरच्या किल्ल्या अश्या होत्या. चपटी निळ्या रंगाची डिजिटल डिस्प्ले असलेली किल्ली त्याच्यावर डबल टॅप केले कि लॉकर नंबर दिसायचा. इराने डबल टॅप केले तर लॉकर नंबर ११४ ओह शीट ! हि तर राधाच्या लॉकरची किल्ली. इरा पुन्हा १० वेळा ती डायरी चाळून काढते पण हिंदी गाणी आणि नोटेशनशिवाय त्यात काहीच तिला दिसत नाही. म्हणजे आता त्या लॉकर मधेच काहीतरी असणार. इरा तडक उठते आणि घरातून बाहेर पडते, पडताना घरातल्या व्हॉइस असिस्टंटला सांगते "बेकी टेल मॉम आय एम गोइंग टू राधाज प्लेस, विल बी बॅक बाय डिनर" बेकी उत्तर देते "शुअर डियर यु वॉन्ट मी टू टेल राईट अवे ऑर इन १५ मिनिट्स लाईक ऑल्वेज?" ... "ऑफकोर्स इन १५ मिनिट्स" असे म्हणून राधा बाहेर पडते. आईचे प्रश्न चुकवण्याकरता नेहमीच इरा असे करत असे. 

इरा शाळेत पोचते तेव्हा तिथे फारशी मुलं नसतात. सगळा अभ्यास ऑनलाईन असल्याने शाळेत फक्त प्रॅक्टिकल करताच यावे लागते म्हणा ... इरा पटकन लॉकर रूम मध्ये जाते तर तिथे मिट काळोख. "इथली मोशन सेन्सर सिस्टीम नेहमीच बंद असते काय यार शीट" असे म्हणून इरा मॅन्युअल ओव्हरराईड स्विच चालू करते. एव्हाना मुलांना शाळेतले सगळे मॅन्युअल ओव्हरराईड स्विच माहिती झाले होते. इरा आसपास कोणी नाही याची खात्री करून राधाचा ड्रॉवर उघडते आणि आत डोकावते तर आत तिला एक कॅमेरा बसवलेला दिसतो तो कॅमेरा चालू आहे हे त्याच्यावरच्या निळ्या लुकलुकणार्या लाईट वरून कळते आणि पटकन त्या ड्रॉवर मधुनन कसलाच स्फोट होतो आणि एक जाड पाकीट इराच्या दिशेने भिरकावले जाते. इरा जोरात घाबरून ओरडते पण काही सेकंदात स्वतःला सावरून ते पाकीट उचलते. उघडून बघते तर काय अगदी घरी आली तशीच डायरी. आता हे आणि काय ... तेवढ्यात तिला कोणाच्यातरी येण्याची चाहूल लागते त्यामुळे ती तिथून सटकते. 

घरी येऊन ती डायरी उघडते. डॉ मिलिंद बापट यांनी त्यांच्या सगळ्या प्रोजेक्टसची माहिती यात लिहिलेली असते. ते जेनेसिस इंटरनॅशनल नावाच्या रिसर्च कंपनी मध्ये डॉक्टर म्हणून काम करत असतात पण खरं म्हणजे ते "नॅचरल बेबी हंटर" असतात. बापरे ... इराने आत्तापर्यंत अश्या लोकांबद्दल फक्त वेब सिरीज आणि पुस्तकांमध्ये ऐकले होते. यांचे काम नॅचरली कन्सिव्ह करून नॉर्मल जन्माला आलेल्या मुलांना शोधून त्यांना टॅग करून समाजात सामावून घेणं हे असते. इतक्यात इराच्या खोलीत प्रचंड मोठा आवाज झाला मोठा प्रकाश पडला आणि सगळी खोली हादरली. आई पळत पळत वर आली आणि दार उघडून आत आली तर आत इरा नव्हती ... फक्त एक स्माईली फेस वाला पिवळ्या फुग्यांचा गुच्छ होता. आई हताश झाली खाली बसली आणि जोरजोरात रडू लागली आणि ओरडू लागली "ओह मिलिंद व्हॉट हॅव यू डन ...". तिला कळले होते कि आता तिला इरा पुन्हा कधीच भेटणार नाही ... निदान प्रत्यक्ष तरी ...  तिला मिलिंदने ह्या बद्दल सगळे सांगितले होते

========================================================================

२०७१ साली नॅचरली कन्सिव्ह करून नॉर्मल बाळे जन्माला घालणे खरंतर बेकायदेशीर कारण अश्या मुलांना कंट्रोल कसे करणार? त्यांच्या ऍक्शन्स, रिऍक्शन्स सगळेच कसे अनप्रेडिक्टबल, कोण कसे वागेल याचा भरवसा नाही. शेवटी कुठल्याही देशाला गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार मुक्त बनवण्यामध्ये संपूर्ण लोकसंख्या हि जेनेटिकली मॉडिफाइड आणि सेन्ट्रली कंट्रोल्ड हवी म्हणजे कसे सगळे अगदी ठरल्याप्रमाणे घडते. इथपर्यंत पोचणे इतके सोपे नव्हते. २०२२ साली झालेल्या केमिकल वॉर आणि त्यातून झालेल्या प्रचंड मानवजाती संहारानंतर जगातील महासत्तांच्या अध्यक्षांनी एकत्र येऊन वैश्विक शांतता करारावर स्वाक्षरी केली आणि त्याची अंमलबजावणी म्हणजे उरलेल्या लोकसंख्येला आणि इथून पुढे तयार होणाऱ्या सगळ्या लोकसंख्येला जेनेटिकली मॉडिफाय करायचे आणि सेंट्रली कंट्रोल करायचे. फक्त २३% लोक यातून वाचले होते. त्यातही बरेच जण घाबरलेले असल्याने अंमलबजावणी करण्यात फार अडचण आली नाही. ज्यांनी विरोध केला त्यांना संपवण्यात आले. २०४० पर्यंत हि प्रक्रिया चालू होती. त्यानंतर जन्मलेल्या सगळ्यांकरिता त्यांना पटेल असा आणि पचेल असाच इतिहास रचला गेला आणि सांगितला गेला. वयाच्या , १५, २५, ४०, ५५, ७०, ८५  व्या वर्षी तुमच्या डीएनए टेस्ट करून तुम्हाला टॅग केले जायचे अगदी गाडी सर्विसिंग करतो तसेच. हे सगळे चालू असताना जमेनीस कुटुंबाने आपल्या मुलीला ह्या सगळ्याहून वेगळे ठेवले तिचा नॅचरल जन्म झाला. ह्यांचा अश्या लोकांचा एक कल्ट होता, सिक्रेट सोसायटी ... जमेनीस कुटुंबाना अपत्य होत नसल्याने त्यांनी सीमन विकत घेऊन बेबी इम्प्लांट केला होता. आपला सिक्युरिटी क्लियरन्स वापरून डॉ मिलिंदना माहिती होते कि इरा हि त्यांचीच मुलगी आहे. त्यामुळे त्यांनी सर्वप्रथम हे सत्य इराच्या आईला अंजलीला सांगून नंतर वडिलांचे ब्रेनवॉश करून त्यांना ह्या कल्ट मध्ये सामावून घेतले होते. इरा योग्य वयात आली कि तिला मी सगळे सांगेन असे त्यांचे म्हणणे होते. मिलिंदला भरवसा होता कि तो नॅचरल जन्माला आलेल्या मुलांनापण तितक्याच लीलया कंट्रोल करू शकणाऱ्या त्याच्या शोधात यशस्वी होईल आणि त्यांना सध्या जे बऱ्याच मुलांना मधूनच सीझ करावं लागत ते करावे लागणार नाही. पण त्या आधीच त्याच्याकडे इराला सीझ करायची ऑर्डर आली आणि तो बिथरला. वास्तविक पाहता चूक अंजलीची होती. इरा १० वर्षाची असताना बाकीच्या मैत्रिणीप्रमाणे आपण नाही हे तिला कळायला लागले आणि ती कोशात गेली पुढे त्याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये झाले आणि एका भवानी क्षणी अंजलीने तिला ती नॉर्मल बर्थ असल्याचे सांगितले. त्याने इरा या कोषातून बाहेर पडली परंतु आतून बाहेरून हादरली. शेवटी तिला बेहेवियर मॉनिटर सिस्टिम ने मार्क केले आणि अश्या लोकांना त्वरित सीझ करायच्या ऑर्डर निघतात. 

पण आता काय उपयोग अंजलीला माहिती आहे कि आता इरा आपल्या भेटणार ते फक्त ऑनलाईन स्टेटस अपडेट्स मधून ...इतर सीझ झालेल्या लोकांप्रमाणेच इरा नावाचा काम्पुटर बॉट कुठल्यातरी सर्वर वर एव्हाना क्रिएट झाला असेल आणि त्याने इराचे पुढचे सगळे आयुष्य प्लॅन करून ठेवले असेल ... आता हे सगळं इराच्या बाबांना सिद्धेशला कसे सांगायचे या विचारात हातात फुग्यांचा गुच्छ घेऊन अंजली जिना उतरू लागते अन अंजलीचा फोन बझ होतो "इरा जस्ट चेकड इन ऍट ७डी वर्चुअल वर्ल्ड ऑफ बॉलीवूड लोणावळा" ….


- विश्वेश