मंगळवार, २२ जानेवारी, २०१३

मळभ


पुढचे काहीच दिसत नसतांना धुक्यातून चालायची एक वेगळीच मज्जा आहे. आपल्या नकळत आपण आयुष्यात देखील बरेचदा असे अंदाजाने चालत असतो. पुढचे दिसत नसते पण रस्ता ओळखीचा असला कि मनातून एक विश्वास असतो कि इच्छित स्थळी नक्की पोचू आपण, अन एक आशाही असते कि हे धुके सरेल. कधी कधी बराच काळ धुकं काही सरत नाही त्यावेळी ते धुके आहे कि मळभ हे ओळखता आले पाहिजे.  या मळभाची सवय होऊ देता कामा नये, नाहीतर आभाळाचा निळा रंग करड्यात मिसळायला वेळ लागत नाही मग आयुष्यातला करडा रंग हळू हळू गहिरा होऊ लागतो. 

धुकं आणि मळभ यातील फरक ओळखण्याकरीता लख्ख सूर्य प्रकाशाची गरज असते. 


बरेचदा आपण धुक्याला पाहून मळभ मळभ असे म्हणून ओरडतो अन हातपाय गाळून बसतो.  तुमच्या आयुष्यातला सूर्य तुम्हालाच शोधायचा असतो. एकदा का तो सापडला कि धुक्याची तमा बाळगू नये. मळभ दूर व्हायला मात्र एकदा तरी मनसोक्त बरसावे लागते त्याशिवाय ते सरत नाही.  त्यामुळे स्वेटर, छत्री, रेनकोट यासारखी निसर्ग-द्वेष्टि साधन वापरण्यापेक्षा मोकळे राहा, मनसोक्त भिजा उन्हातही अन पावसातही, थंडीतली थरथर काळजापर्यंत पोचुद्या ... 
कोणास ठाऊक अश्याने तुमच्या आयुष्यावरचे मळभ सरेलही कदाचित ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: