कोणास ठाऊक कसे पण आज वाटले चिंब भिजावेसे ...
- विश्वेश
वाटले मारावी उडी त्या चिखलात
अन बरबटून घ्यावे सगळे पाय अन हात ...
मन तर कधीच बरबटले आहे .... कुठेतरी खोल आत ...
कोणास ठाऊक कसे पण आज वाटले चिंब भिजावेसे ...
भिरकावून द्यावी ती हातातली छत्री
भरून घ्यावा हा निसर्ग आपल्या गात्री ...
नंतर पुन्हा आहेतच न ओल्या न कोरड्या अश्या कुबट रात्री ...
कोणास ठाऊक कसे पण आज वाटले चिंब भिजावेसे ...
भिजतानही आतून मी कितीतरी वेळ जळत होतो
डोळ्यातले पाणी त्या पावसात मिसळत होतो
आज पुन्हा एकदा पाऊस मला अन मी पावसाला छळत होतो ...
कोणास ठाऊक कसे पण आज वाटले चिंब भिजावेसे ...
- विश्वेश