सोमवार, ९ डिसेंबर, २०१३

कॅनव्हास

गेले अनेक दिवस
तुझे नि माझे रंग
एकमेकात मिसळतो आहे मी …

मला माहिती नव्हते
कि सगळे रंग एकत्र आले
कि बनतो तो काळा रंग …

आता चाचपडतो आहे
त्या अंधारात शोधत
तुझे नि माझे ते पूर्वीचे रंग …

तुझ्या डोळ्यांचा निळा
तुझ्या अधरांचा गुलाबी
अन तुझ्या हातातल्या गुलमोहराचा लाल …

खूप वेळा पुसायचा प्रयत्न केला
स्वताला, स्वताच्या रंगांना
पण, सगळे इतके गडद झाले आहे कि …

पुसताना भीती वाटते आता,
कॅनव्हास  फाटण्याची … किंवा
पुन्हा पांढरा पडण्याची …

 - विश्वेश

सोमवार, ९ सप्टेंबर, २०१३

गणपतीचे दिवस !

आज सकाळी नेहमीची धावपळ चालू असतांना घरात नवीनच आलेल्या बाप्पांनी हाक मारली "अरे कसली एवढी घाई … ?"
"अरे तुझं बर आहे बाप्पा, तुला आता १० दिवस नुसती ऐश करायची आहे … मोदक, पेढे, मखर, आरास … आम्हाला काम आहे … बॉस आहे तिकडे … " मी पोराचे शाळेचे दप्तर भरता भरता उत्तरलो…
"बर बर … मग आज आमचे छोटे उस्ताद … तुमचे चिरंजीव तरी … " बाप्पा काय विचारणार याचा अंदाज आल्याने मी वेळ न दवडता लगेच म्हणालो "छे आज त्याच्या शाळेत गणपती फेस्टिव्हल चे सेलिब्रेशन आहे. बघितलं नाहीस का, एथनिक वेअर, खाऊचा डबा … आणि हो तू विचारायच्या आत सांगतो गृहलक्ष्मी ला सध्या कंपनीमध्ये फार काम आहे … रिलीज चालू आहे त्यात गौरीला हाल्फ-डे घेतलाय आणि विसर्जन नेमकी शुक्रवारी आले असल्याने तिची पंचाईत झाली आहे …" बोलता बोलता पोराचे दप्तर भरून तयार झाले.

पटकन समयीतल्या कालच्याच वाती लांबवल्या तेल रिफील केले, पोराच्या हाती घंटी दिली आजी आजोबांना समजले कि आरतीची वेळ झाली, ते हि रांगेत येउन उभे राहिले अन आरती सुरु झाली. नेहमीपेक्षा अंमळ जास्त वेगात अन "स्मरणे मात्रे मन" गाळून पटकन आरती उरकली, काका हलवाई कडून आणलेले फ्लेवर्ड पेढे प्रसाद म्हणून टेकवले. बायकोने कालच्या प्रसादाचा काला (विविध लोकांकडून, सोसायातीमधून वगैरे आलेल्या आणि घराच्या उरलेल्या प्रसादाचे मिश्रण) एका डब्यात भरून दिला आणि आम्ही निघालो.

"अरे काहीतरी चमचमीत आण संध्याकाळी प्रसादाला, गोड खाऊन खाऊन कंटाळा आला, त्या काका हलवाईच्या मटार करंज्या … बघ म्हणजे जमले तर  … आणि हो …" बाप्पा पुन्हा बोलू लागले
आधीच घाई, त्यात बाप्पा पुन्हा अजून वेळ खाणार म्हणून मीच आधी क्लियर केले , "आ(जो)बा, तुम्ही सांगा हो बाप्पाला किती बिझी श्येडूल असते वीकडे चे, बाप्पा ते प्रसादाचे वगैरे  डिपार्टमेंट आजी आबांचे असते. चलो बाप्पा संध्याकाळी भेटू … " असे म्हणून काढता पाय घेतला.

एव्हढे सगळे करून मी आणि बायको आपापल्या कंपनीत, पोरगा शाळेत (नटून थटून) वेळेवर पोचल्याने मनातल्या मनात बाप्पा मोरया म्हणत नेहमीच्या टपरीवर चहाचा पहिला घोट घेतला …

आता १० दिवस घरी आजी आबांची मजा आहे, वेळ घालवायला नाही म्हंटले तरी अजून एक पाहुणा आहे असे म्हणत मी फेसबुकवर ४-५ मित्रांचे घरगुती गणपतीचे फोटो लाईक केले.

- विश्वेश

रविवार, २८ एप्रिल, २०१३

दोन दिवस


माझ्या सर्व कर्जबाजारी मित्रांकरिता  - (स्पेशली होम लोन वाले)
-------


दोन दिवस भाड्यात गेले, दोन दिवस हफ्त्यात गेले
हिशोब करतो आहे आता पैसे किती हे खात्यात उरले !

शेकडो वेळा पगार आला, आशा फुलल्या, मनं धुंद झाली
घराच्या खिडकीतून चंद्र बघण्यातच जिंदगी बर्बाद झाली

नोकरी हेच माझे सर्वस्व, कर्जाकडे गहाणच राहिली
कर्जापुढे मान न उंचावता, सदा कलम झालेली पाहिली

हरघडी एफड्या मोडल्या नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा एफड्याच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

कर्जाचा विचार हरघडी केला अगा कर्जमय झालो
कर्ज घ्यावे कसे, पुन्हा भरावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस भाड्यात गेले, दोन दिवस हफ्त्यात गेले.

- विश्वेशमूळ कविता - 

दोन दिवस

दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले.


कवी - नारायण सुर्वे


मंगळवार, २२ जानेवारी, २०१३

मळभ


पुढचे काहीच दिसत नसतांना धुक्यातून चालायची एक वेगळीच मज्जा आहे. आपल्या नकळत आपण आयुष्यात देखील बरेचदा असे अंदाजाने चालत असतो. पुढचे दिसत नसते पण रस्ता ओळखीचा असला कि मनातून एक विश्वास असतो कि इच्छित स्थळी नक्की पोचू आपण, अन एक आशाही असते कि हे धुके सरेल. कधी कधी बराच काळ धुकं काही सरत नाही त्यावेळी ते धुके आहे कि मळभ हे ओळखता आले पाहिजे.  या मळभाची सवय होऊ देता कामा नये, नाहीतर आभाळाचा निळा रंग करड्यात मिसळायला वेळ लागत नाही मग आयुष्यातला करडा रंग हळू हळू गहिरा होऊ लागतो. 

धुकं आणि मळभ यातील फरक ओळखण्याकरीता लख्ख सूर्य प्रकाशाची गरज असते. 


बरेचदा आपण धुक्याला पाहून मळभ मळभ असे म्हणून ओरडतो अन हातपाय गाळून बसतो.  तुमच्या आयुष्यातला सूर्य तुम्हालाच शोधायचा असतो. एकदा का तो सापडला कि धुक्याची तमा बाळगू नये. मळभ दूर व्हायला मात्र एकदा तरी मनसोक्त बरसावे लागते त्याशिवाय ते सरत नाही.  त्यामुळे स्वेटर, छत्री, रेनकोट यासारखी निसर्ग-द्वेष्टि साधन वापरण्यापेक्षा मोकळे राहा, मनसोक्त भिजा उन्हातही अन पावसातही, थंडीतली थरथर काळजापर्यंत पोचुद्या ... 
कोणास ठाऊक अश्याने तुमच्या आयुष्यावरचे मळभ सरेलही कदाचित ...

सोमवार, २१ जानेवारी, २०१३

पुस्तक


आपण एखाद्या लांबच्या प्रवासाला निघालो आणि गाडीत बसलो कि राखून ठेवलेले एखादे पुस्तक काढतो वाचायला अन त्याच वेळी आपला शेजारी देखील त्याचे पुस्तक काढतो तेव्हा आपले लक्ष आपल्या पुस्तकापेक्षा त्याच्या पुस्तकात डोकावण्यात जास्त असते. 

नवरा बायकोचे पण तसेच असते काहीसे असे मला वाटते. म्हणजे दोघेही आपापली पुस्तक वाचत असतात पण दुसर्याच्या पुस्तकाबद्दल एक आकर्षण, ओढ आणि हळू हळू हक्क वाटू लागतो. आपण त्यात डोकावू लागतो, मग स्वताच्या पुस्तकामाधली पानं कधी सवयीने तर कधी दुसर्याला कळू नये म्हणून तर कधी आपोआप उलटली जातात.  संसारात खरी मज्जा तेव्हा आहे जेव्हा दोघेही एकच पुस्तक वाचाल. एकाच सुखी शेवटाच्या ओढीने ... मग आपोआपच दुसर्याचे वाचून होईपर्यंत थांबणे, एखाद्या विनोदाला दोघांनी एकत्र हसणे, एखाद्या गहीवरणाऱ्या प्रसंगी हात हातात घट्ट धरणे ह्या सगळ्याची मजा येते.

आज अनेक नवरा बायको आपापली वेगळी पुस्तके वाचत आहेत, आपापल्या गोष्टीमध्ये रममाण आहेत. मग ते मधेच खुदकन हसणे, डोळ्यांचे ओलावणे हे सगळे त्याला अनोळखीच ना ... कारण त्यावेळी तो दुसर्याच गावी ... त्याच्या त्याच्या पुस्तकात मग्न ... दोन्ही पुस्तकांचे शेवट गोड असतीलही कदाचित पण ते एकटयानेच चाखायचे यात काय सुख. त्याच्या किंवा तिच्या पुस्तकात डोकावून तर बघा आवडेल तुम्हालाही ते कदाचित. हळूहळू त्या   पुस्तकाबद्दलची ओढ कमी होण्याच्या आत तुमचे पुस्तक बदला. मग दोघांना एकाच गोष्टीची ओढ, एकसारखी हुरहूर अन दोघांची वाटचाल एकाच सुखी शेवटाकडे असेल.

बर हे पुस्तक संपले तरी दोघांकडे एकसारख्या आठवणी असतील ... चर्चेला दोघांच्या आवडीचा विषय असेल आणि यातूनच संवाद वाढेल. संवादाला लय प्राप्त झाली कि त्याचा सुसंवाद होतो. आणि यासारखे सुरेख जीवनगाणे नाही.

तेव्हा एकदा वाचून बघा एखादे पुस्तक एकत्र ... 
तुमचा लांबचा प्रवास सुखकर होईल हे नक्की ...


ता. क. - फार 'पुस्तकी' आहे पण पहिल्यांदाच असे काही लिहित असल्याने चू.भू.द्या.घ्या.

बुधवार, २ जानेवारी, २०१३

प्रतिज्ञा


प्रतिज्ञा 
--------
फेसबुक माझा देश आहे।
सगळे फेसबुकीय माझे मित्र आहेत।
माझ्या प्रोफाईलवर माझे प्रेम आहे।
माझ्या फेसबुक वरील समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या अपडेट्सचा मला अभिमान आहे।
माझे स्टेटस अपडेट्स जास्तीत जास्त जण (मुली) लाईक करतील हि पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या पालकांना , गुरुजनांना 
आणि वडीलधार्‍या माणसांना माझ्या प्रोफाईल पासून लांब ठेवीन
आणि प्रत्येकाचे पोस्ट लाइक करेन ।
माझे फेसबुक  आणि माझे फेसबुक-मित्र 
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे स्टेटस अपडेट्स आणि
त्यांचे बहुढंगी फोटो पाहण्यातच माझे
सौख्य सामावले आहे।


जय टाईमपास ! जय फेसबुक !