आज बर्याच दिवसांनी तिचाकी वाहनात बसून तुळशीबाग मधील श्रीकृष्ण भुवन मध्ये मिसळ खाण्याचा योग आला ...
कार्यालयातून तिचाकी वाहनातून प्रस्थान केले ... आणि लकडी पूल ओलांडला तेव्हा असे वाटले जणू काही वर्तमान काळातून भूतकाळात प्रवेश केला ...
सगळ्या जुन्या आठवणींची चित्रफीत काही क्षणात डोळ्यासमोरून झर्रकन निघून गेली ... अचानक सगळे कृष्ण-धवल दिसू लागले ...
पांढरा सदरा, खाकी विजार घातलेला मी ... आई बरोबर काकाकुवा मेन्शन च्या वीज बिल भरणा केंद्राच्या रांगेत उभे दिसलो ...
वीज बिल भरून झाले कि अगत्य मधील डोसा किवा उभ्याचा वडा हा ठरलेला अल्पोपहार असायचा ... फ़क़्त त्या लालसेपोटी मी वीज बिल भरायला उत्सुक असायचो ...
आणि वडील बरोबर असले कि श्रीकृष्ण ची मिसळ ... पावले आपोआप श्रीकृष्ण कडे वळत होती ...
माझ्या पुढून छोटा मी वडिलांच्या बरोबरीने जात होतो ... तुळशीबागेतील आजूबाजूंच्या दुकानांमधील रंगीत आरास पाहून माझे लहान डोळे नेहमीच चमकून जायचे ...
श्रीकृष्ण मध्ये नेहमीप्रमाणे गर्दी असली कि वडील मला लाईन मध्ये उभे करून रुमाल/पट्टा इ. खरेदी उरकून घ्यायचे....
आम्ही आत शिरलो ... टूमकन उडी मारून मी माझी जागा पटकावली ... आणि मिसळ फस्त करण्यासाठी सगळी इंद्रिये उत्सुक झाली ...
मनसोक्त मिसळ खाल्ल्यावर ... खरतर नेहमीची सवय ... जोगेश्वरी च्या बोळातून बाहेर अप्पा बळवंत चौकात यायचे ...
वडील रसिक साहित्य वाचनालयमध्ये पुस्तक बदलायला आणि मी कराची मध्ये लस्सी प्यायला ....
आज .... फ़क़्त मिसळीवर भागवून पटकन परतीच्या प्रवासाला लागलो ... पुन्हा तिचाकी मध्ये बसून ...
परतताना ... जेव्हा पुन्हा लकडी पूल ओलांडला तेव्हा जाणवले ...
हा पूल साधासुधा नसून जुन्याला नव्याशी जोडणारा आहे ... दोन पिढ्या मधील दरीवर बांधलेला .....
ह्या पुलावर दुचाकींना/लहान वाहनांना परवानगी नाही ... जणू काही जुन्याने नव्याचे स्वागत मोठ्या मनाने करावे सांगणारा ...
एक लहान मुलगा आईचा हात सोडून पुलाच्या कठड्यावरून खाली पाण्यात मास्यांना स्वताच्या खाऊ मधला एक राखून ठेवलेला वाटा टाकत होता ...
तो माझ्याकडे पाहून जोरात हात हलवत हसला .... माझाही हात नकळत प्रतिसादासाठी उठला ... पण इतके निरागस आणि शुद्ध हसू काही फुटले नाही ....
पूल ओलांडला ... पुन्हा वर्तमानात परतलो ... मागे वळून पहिले ... सगळे धूसर दिसत होते ...
डोळ्यावरील भूतकाळाचा ओलावा टिपला ... आणि भावनाहीन होऊन पैसे छापायचा घाणा पुन्हा सुरु केला ...