मंगळवार, २९ मार्च, २०११

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

स्वतापुरते लढायचे बळ तेवढे आता गाठीशी आहे ...
आठवते म्हणाला होतास "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ..."

तुझ्या ह्या आश्वासनाने केले होते भितीना दफन ...
अन उभा ठाकलो लढाया जगाशी बांधून डोईवर कफन
माहित नव्हते माझी लढाई नशिबाच्या काठीशी आहे ....
आठवते म्हणाला होतास "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ..."

लढलो अनेक समरे काही जिंकलो काही हरलो
लढता लढता लोटली वर्षे, परंतु मागे नाही फिरलो ...
हरलो शेवटी वयाकडून, माहित नव्हते गाठ साठीशी आहे ...
आठवते म्हणाला होतास "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ..."

गळाले सगळे बळ, अन गळाल्या सगळ्या आशा
आलास समोरून चालत अन दिलास पुन्हा दिलासा ...
दाखवलास मज आरसा माझ्याच भूतकाळाचा
दिसला त्यात चेहरा मज एक निरागस बाळाचा ...

दाखवून मलाच माझे बिंब म्हणालास
"कोण तू होतास  ... अन काय तू झालास"
उभ्या जीवनाचा अनुभव तुझ्या गाठीशी आहे ....
अन म्हणालास "भिऊ नकोस .... तू माझ्या पाठीशी आहे"

सोमवार, २८ मार्च, २०११

मज्जा आहे बुआ ....

माझ्या मुलाची एक मैत्रीण आहे खास, एका कामवाल्या बाईची गरिबाघरची पोर आहे ... दोघांचे छान जुळते .
मला नेहमी वाटायचे कि काय बोलत असतील हे एकमेकांशी ? ह्या कविते मधून ते काहीसे मांडायचा प्रयत्न ....

gas  वरील मऊ मऊ तूप पोळी भरवते तुला आई ...
माझ्या मात्र नाकातोंडात सतत चुलीचा धुआ
एका मुलाची काय भलतीच मज्जा आहे बुआ ....

झोपतोस तू शांतपणे लाऊन गुड नाईट कि काय
आम्ही मात्र पुरवतो महिनाभर तुकड्या तुकड्याने कछुआ
एका मुलाची काय भलतीच मज्जा आहे बुआ ....

फिरत असते मी एकटीच दिवसभर स्वताशीच खेळत
तुझ्या मागे असतो ताफा आजी आबा मौस्या अन बुआ
एका मुलाची काय भलतीच मज्जा आहे बुआ ....

कित्येकदा असते आजारी अन अनवाणी कोणाला काय त्याचे
सुटाबुटात ठेच लागली तरी जग विचारते तुला क्या हुआ क्या हुआ ?
एका मुलाची काय भलतीच मज्जा आहे बुआ ....

आमच्या कडे कायमच काळोख त्याची कसली रे तुला भीती ?
मला तर त्यात सापडते माझी परी तुला मात्र दिसतो बुवा ...
एका मुलाची काय भलतीच मज्जा आहे बुआ ....

उष्टे, उरले, नासले भर भरून दिलेस मला ...
मी पण गोड मानले अन नेहमीच दिली तुला दुआ
एका मुलाची काय भलतीच मज्जा आहे बुआ ....

मी अशी टाकलेली सोडलेली वार्यावर जगायला ...
तू असा आंजरलेला गोन्जारलेला आपल्यात कसा जुळणार दुवा
एका मुलाची काय भलतीच मज्जा आहे बुआ ....
एका मुलाची काय भलतीच मज्जा आहे बुआ ....

मंगळवार, २२ मार्च, २०११

त्रैराशिक ....


आठवत नाही ध्येया मी  कधीचे तुझ्या मागे धावतो आहे 
तू पुढे कि मी माहित नाही पण सवय म्हणून जगतो आहे 

न तुला थकायची सवय राहिली न मला थकायची सवड 
एकमेकांभोवती फिरता फिरता होते दोघांचीही परवड 

जगण्याची हि युद्ध नीती मी शिकलो आईच्या पोटात 
उमगले नाही मलाच कधी शिरलो ऐहिकाच्या गोटात 

मिळाले भरभरून सगळे तरीही मी अजून मागतो आहे ...
मन मारून केलेल्या सौद्यांना अन वचनांना जागतो आहे 

आज उमगले खरं तर, 
जगण्याच्या त्रेराशिकात मी सुखाला उपभोगाने भागतो आहे 

रविवार, २० मार्च, २०११

आज नव्याने

आज पुन्हा नव्याने केली मी जुन्या गीतांची होळी 
आज पुन्हा नव्याने शिवली मी माझी फाटकी झोळी 

झालो सज्ज रचाया तुझ्यावर नवीन सुरेल गाणी 
उघडली पुरचुंडी अन, काढल्या जुन्या आठवणी 

जुनेच सूर जुनेच तराणे ... लिहितो मी शब्द नवे 
जुनाच पूर जुनेच बहाणे ... वाहतो मी तुझ्या सवे 

मुद्दाम झालो पूर्णपणे रिते ... आता टाकली ती कात
लिहायचो पूर्वी प्रेम गीते ... आता टाकली ती जात  

कवितेमधून दिसती आता ... काही उरले ओले क्षण 
दिसते तगमग उरातली अन ... दिसते थरथरले मन 

फिरून नव्याने विणतो आहे तीच जुनी मी जाळी
आज पुन्हा नव्याने शिवली मी माझी फाटकी झोळी 
आज पुन्हा नव्याने केली मी जुन्या गीतांची होळी 

शुक्रवार, १८ मार्च, २०११

चित्त रमले हरिपायी ....

सोडली जुनी  वहाणे ....   चाललो पंढरीचे ठायी ....
चित्त रमले  हरिपायी .... चित्त रमले  हरि  पायी ....

आला न्यानियाचा गाव .... जमले सारे रंक नि राव ....
हरिनामाच्या घोषात ... उभा आसमंत न्हाही 
चित्त रमले  हरिपायी .... चित्त रमले  हरि  पायी ....

रूप पाहता लोचनी .... तृप्त जाहलो ध्यानीमनी ....
पाहून सावळा मनोहर .... भान हरपून जाई ....  
चित्त रमले  हरिपायी .... चित्त रमले  हरि  पायी ....

विसरुनी रोजचा रहाट .... झाली नवीन पहाट
झालो कधी मोकळा .... माझे मलाच कळले नाही ... 
चित्त रमले  हरिपायी .... चित्त रमले  हरि  पायी ....

गुरुवार, १० मार्च, २०११

पैलतीर ...

केले अथक परिश्रम गाठाया पैलतीर ...
नाही ओलांडू शकलो सखे तुझ्या नयनीचे नीर 

सोडून सगळे मागे चाललो नव्या देशात ...
गुंतले हात सखये मात्र तुझ्या मोकळ्या केसात 

पुसले सारे संकेत पुसल्या त्या आठवणी ...
ओठावर पण अजून रेंगाळती तुझी मोहक गाणी 

वाटले झालो मोकळा तोडले सगळे पाश 
वाटले सरले धुके अन झाले मोकळे आकाश 
पाऊले पुढे नेत होती ... मन म्हणत होते .... मागे फिर 
नाही ओलांडू शकलो ....       सखे तुझ्या नयनीचे नीर 

सोमवार, ७ मार्च, २०११

शरण


सांग सखे कसा आवरू मी बुडण्याचा मोह 
खुणावत आहेत मजला तुझ्या नयनीचे डोह 

नको लवून पहाटे अशी वेचू ... सखे...     फुले 
मन उगाच बांधती मग...  तुझ्या झाडी ... माझे झुले 

केली सगळी तयारी मनी एकच हा ध्यास 
कधी करायचा सांग... सात पावलांचा प्रवास 

सांग कधी पडतील हव्याहव्याश्या त्या गाठी ...
अन माझ्या नावाभोवती तुझ्या नावाची ग मिठी 

आता नको नाही म्हणू, आता नको मागे फिरू,  आलो तुला मी शरण 
माझ्याशिवाय तुझ्या जगण्यात,  आपसूक माझे मरण ... माझे मरण 

रविवार, ६ मार्च, २०११

मी घर बदललंय


दर आठवड्याला ठरल्याप्रमाणे देवळात गेलो .... अन ह्या २ ओळी सुचल्या .....

देवभोळा नसण्याची permission मी देवाकडूनच घेतली आहे ...
अन आमच एकमेकाला status reporting weekly आहे ...

पुढे त्याचा विस्तार एका वेगळ्याच कवितेत झाला ....


कुठे गेली माझ्या घरावरची तुझी सावली...  
कुठे गेला तो मेघ, कुठे गेली ती कृपावृष्टी ... आता सगळच सरलंय ..
मला काळात नाही देवा ... कि तू जागा बदललीस कि मी घर बदललंय

महागाई नुसार वाढवलाय मी तुझ्या दक्षिणेचा भत्ता ...
अन त्याच पेटीत टाकला आहे मी माझा नवीन पत्ता 
बघ जमले तर काढ मज पामरासाठी थोडा वेळ 
अन संपवून टाक एकदाचा हा उन सावलीचा खेळ 

लढताना रोजची लुटुपुटूची लढाई नाही आली कधी कपाळावर आठी 
अरे कारण विश्वास होता माझा कि कितीही झाले तरी तू आहेस पाठी 
तुला असे वाटले का कि ह्याला आता आपली गरज नाय ....
चेहऱ्यावरचे हसू पाहून .... घेतलास कि तू काढता पाय

आता सवय होऊ लागली आहे तुझ्याशिवाय जगायची ...
आता सवय होऊ लागली आहे तुझ्याशिवाय लढायची ...
तरीही नित्य नेमाने घालतो प्रदक्षिणा ... तुझ्या गाभार्याभोवती 
तुझ्याशिवाय माझा मी लढतो आहे ...     ह्याची खरतर हि पावती ...

ज्या दिवशी माझा नित्यक्रम चुकेल त्या दिवशी ... तू ये घरी 
तेव्हा तुझी खरी गरज असेल....  सध्या सगळ बर चाललंय 
मला काळात नाही देवा ... कि तू जागा बदललीस कि मी घर बदललंय

शनिवार, ५ मार्च, २०११

अनपेक्षित

हि फार जुनी १२ वर्षांपूर्वीची कविता आहे ... आज सापडली :)


आठवत नाही शेवटचे केव्हा जोडले होते हात
होतो राउळी की कोणा थोरा मोठ्यांच्या पायात  

ठरवले होते हातावराल्या रेशा पुसून टाकेन 
स्वताच्या मुठिच्या बळावर जग जिंकुन टाकेन  

खुप समरे लढलो, काही हरलो काही जिंकलो  
कितीही धाराशायी झालो तरी मागे नाही फिरलो  

वाटत होते नाही गरज मला देव या समजुतीची  
ताकद आहे आसमंत पेलायची ह्या पोलादी छातीची  

परंतु मन मात्र अजिबात समाधानी नव्हते  
कळत नव्हते सर्वाना भुलवणारे ह्या देवात तरी काय होते  

एके दिवशी ठरवले जाऊन पाहावे राउळी  
शोधू आहे तरी काय ताकद श्रध्ध्ये मधली  

दिवसामागून दिवस गेले, वर्षा मागून वर्ष 
नित्य नियम चालू होता पण निघत नव्हता निष्कर्ष  

एक मात्र फारच अनपेक्षित रित्या घडले 
एक दिवस अचानक मी पुन्हा हात जोडले  
एक दिवस अचानक मी पुन्हा हात जोडले

गुरुवार, ३ मार्च, २०११

मृत्युशय्येवर ....


अजून किती राती काढू सखे अश्या झुरत  ....     झुरत ?
घे तुझे हे साठवलेले सगळे क्षण साभार ....   परत 

आता नाही उरले त्राण ...   आठवणीत रमायला 
आता नाही उरले प्राण ...   ओवाळून टाकायला 

उरले फ़क़्त वास्तव भेसूर,   अन उरला रितेपणा 
सरल्या सगळ्या इच्छा,      अन सरला जीतेपणा

नका तीर्थ ओतू ..  नका ठेऊ तुळस, वेळ आली जाण्याची  
अशीच निरंतर राहूदे चव,     तिच्या हातच्या पाण्याची 

बुधवार, २ मार्च, २०११

देवा ...

आस्तिकतेची भीती बाळगून ओढून ताणून नास्तिक मी
खरे तर तुला भेटण्या अत्यंत आतुर अन अगतिक मी ...

समाजातले स्थान टिकविण्या चढतो तुझी पायरी
चुकवीत डोळा मग तुझ्यावरच करतो मनसोक्त शायरी ...

तुझ्या पुढ्यात मनातली हुरहूर अन चिंता वाढत जात 
नकळतच मग,  शरीर जोडते हात अन मन सोडते हात ...

पितोही मग ओंजळीतून मी तुझ्या चरणीचे तीर्थ 
दाटून येतो घशाशी तेव्हा अवघा जगण्याचा अर्थ ...

भक्तांच्या गर्दीमधल्या नास्तिकतेच्या ढोंगाचे प्रतिक मी 
खरे तर तुला भेटण्या अत्यंत आतुर अन अगतिक मी ...