सोमवार, २५ जुलै, २०११

लिपस्टिक - पूर्ण कथा (पहिल्या सगळ्या भागांसकट आणि शेवटचा तुकडा जोडून)



लिपस्टिक - पूर्ण कथा 

"तू अशी कशी ग वेंधळी  ... चल आता लवकर ..." मीना खेकसून अंजूचा हात धरून तिला बाहेर काढत होती. "अगं हो हो पोचू वेळेत ... मला लागतंय ... जरा हळू " ... अंजू हात सोडवत म्हणाली ...
त्यांची ती छोटीशी खोली सकाळी सकाळी मीनाने नेहमीप्रमाणे उदबत्तीच्या सुगंधाने मोहरून टाकली होती ... हे देखील एक कारण होते कि अंजू स्वता जरी लवकर उठली तरी लोळत पडायची मीनाची आंघोळ, युनिफोर्म घालणे, पूजा करणे हे सगळे आटपेपर्यंत. नाहीतरी तिला कुठे लवकर उठून दिवे लावायचे आहेत, तिची तर रात्रपाळी नेहमीचीच. "मी आंघोळ वगैरे करून येऊ कि .." अंजू मुद्दाम केसाचा पसारा करत म्हणाली ... "अगं बये मरूदे तुझी आंघोळ ... तुझी पापं एका आंघोळीने नाही धुतली जाणारेत ... चल आता ७:४१ पकडायची आहे, ती मिळाली कि मग रिक्षेने नेहमीच्या वेळेत पोचेन मी". लगबगीने मीनाने पटापट नेहमीच्या सगळ्या गोष्टी पर्स मध्ये कोंबल्या आणि पुन्हा एकदा मोर्चा अंजू कडे वळवला ... "हो राणी .. हे बघ लगेच निघू मला २ मिनिटे दे" अंजूने घड्याळाकडे बोट दाखवून सांगितले ... घड्याळ नेहमी प्रमाणे १५ मिनिटे पुढे होते आणि ते ७:२० अशी वेळ दाखवत होते. कल्याण च्या गांधी चौकातून स्टेशन ला जायला टांग्याने १० तर रिक्षेने ५ मिनिटे लागतात त्यामुळे मीना थोडी मंदावली. सहज मीनाचे लक्ष खोलीतल्या देव्हार्याकडे गेले ... आणि पुन्हा एकदा तिने डोळे मिटले आणि स्वताशीच काहीतरी पुटपुटु लागली. "चला उशीर होत आहे न तुम्हाला" मीनाची तंद्री अंजूने गदागदा हलवून मोडली. दोघी बाहेर पडल्या, कडी घातली, अंजूने कुलूप घातले आणि शेजारच्या घरात खिडकीतून किल्ली आत टाकली ती समोरच्या पोह्याच्या पातेल्याला जाऊन धडकली ... अंजू बाहेरूनच ओरडली "मावशे, किल्ली टाकली आहे ... दोन तासात येते, पोहे ठेवा रतन शेठ आमच्या करता थोडे आल्यावर खाते" खिडकीपाशी पोहे चिवडत ५ वर्षाचा रतन, शेजारच्या उमा मावशीचे रत्न बसले होते. उमा साळवी हि ह्या दोघींची मानलेली किवा गरजेने झालेली मावशी, आणि त्यांची घर मालकीण. साळवी काका रेल्वे मध्ये आहेत आणि इथे त्याच्या ४ खोल्या आहेत, दोन मध्ये ते स्वता रहातात, एक बंद आहे आणि एका खोलीत मीना आणि अंजू गेली ६ वर्ष रहात आहेत. किल्ली खिडकीतून फेकणे आणि बाहेरूनच निरोपांची देवाण घेवाण हे अगदी सवयीचे आहे सगळ्यांचे. 

आज नेहमीच्या रस्त्याने वाड्यातून बाहेर न येता, मीनाने तळ मजल्यावरील जोश्यांचे दार वाजवले आणि दोघी त्यांच्या घरातून पुढे त्यांच्या दुकानात आल्या ... हा त्यांचा घाई असली कि वापयाचा शोर्ट कट होता, नाहीतर वाड्याचे मुख्य दार मागच्या बाजूला होते तिथून मूळ रस्त्यावर येण्यासाठी ५ एक मिनिटाचा वळसा पडायचा. जोश्यांचे व्हरायटी शॉप होते म्हणजे अगदी गोळ्या-बिस्किटे पासून पावडर-टिकल्या ते पेन्सिल सेल, क्रिकेट चे सामान, शालेय साहित्य, ब्रेड अंडी इत्यादी इत्यादी सगळे समान मिळायचे. जोशी आणि त्यांच्या सौ हे एका पोर्याला हाताशी घेऊन गेली १५ वर्षे हा धंदा चालवीत होते. हा पोर्या म्हणे त्यांना उकिरड्यावर सापडला...  लग्नानंतर १२ वर्ष झाली तरी स्वताचे मुल नाही म्हणून त्याला घरात आणले आणि ३ वर्षांनी जोशी काकुना स्वताचे कन्या रत्न झाले ... तेव्हापासून ह्याचा पोर्या झाला. आणि त्याची रवानगी बिछान्यावरून थेट दुकानात गोणपाटावर झाली, शाळा सुटली. असो मीना आणि अंजू एव्हाना रिक्षा पकडून स्टेशन वर पोचल्या होत्या तेव्हा स्टेशन च्या  घड्याळावर बरोबर ७:३२ झाले होते. मीनाने रिक्षेचे पैसे दिले तोवर अंजू तिकीट खिडकीवर गेली होती.  घाटकोपर ला जाणारी टिटवाळा फास्ट बरोबर ७:४१ ला सुटली आणि मीनाने पुन्हा एकदा अंजूला दंडाला जोरात धरले "तुला नक्की आठवते आहे ना? तिथेच असेल ना? अन्जे माझी नोकरी जाईल ...", "दुसरी मिळेल, त्यात काय इतके ?" अंजूने मुद्दाम डिवचले. "इथे ४ वर्ष घासते आहे ... ते काही असे सोडायला नाही" मीनाला माहिती होते अंजू मुद्दाम करते आहे ते पण राग आवरला नाही तिला आणि तिने अंजूच्या दंडाला अजून जोरात आवळले "हो बरोबर आहे ... घासले म्हणून सोडायचे नाही कि तुझ्या शारुख करता ?" अंजूने पुन्हा एकदा डिवचले आणि आता तर अगदी नको त्या ठिकाणी. "बस कर अन्जे, एक तर तुझ्या वेंधळे पणामुळे हा हेलपाटा पडतो आहे  आणि तू ..." मीनाने दंड सोडत विषय टाळायचा प्रयत्न केला. "बर बाई चुकले माझे, आता काय इथे पाय धरू ?" अंजू दंड चोळत म्हणाली. "पाय धरू नकोस तेवढे आपले काम वेळेत झाले म्हणजे मिळवले" मीना ने मान दुसरीकडे फिरवली. आता तिने एका हाताने लोकल चा दाराजवळचा खांब धरला होता आणि दुसर्या हाताने तिचा  आपल्या गळ्यातल्या आय कार्ड शी चाळा सुरु झाला, सारखे ते स्वताभोवती फिरवायचे ज्याने गळ्यातल्या दोरीला पीळ पडायचा आणि मग पुन्हा तो पीळ सोडवायचा. तिने सहज आय कार्ड उचलले आणि बघितले "रेव्हेल्युशन मॉल, आर सिटी, एल बी एस मार्ग, घाटकोपर, मुंबई ४०००८६. तिचा एक खूप गोड फोटो त्यावर होता, तसे निरागस हसू तिला पुन्हा कधी फुटलेच नाही. पुढे तिचे नाव - मीनल महाजन

मीना उर्फ मीनल मुळची सांगलीची, अंजू पण. अंजू चे खरे नाव सोनाली होते, तिला अंजू हे नाव मुंबई ने दिले होते. मीनल आणि अंजू एका वर्गात, एकाच वाड्यात राहायच्या, अगदी जिवाभावाच्या मैत्रिणी, मीना चे वडील गेले आणि तिने मावशीच्या ओळखीने ६ वर्षापूर्वी मुंबई गाठली, तिच्या बरोबर अन्जुनेही मुंबई गाठली. अंजूला आई वडील नव्हते ती तिच्या आजी आजोबांकडे वाढली, खरं तर मीना च्या घरीच वाढली. त्यामुळे अंजूवर खूप जुने ऋण आहे महाजन कुटुंबाचे आणि त्यामुळेच अंजू मीनाला घट्ट धरून आहे. अंजू मीना पेक्ष बरीच धीट आणि बरीच हुशार आहे, त्यामुळे महाजन कुटुंब म्हणजे मीना ची आई, आजी आणि लहान भाऊ ह्या सगळ्यांचा मीना पेक्षा अंजू वर जास्त भरवसा आहे. गेले ६ वर्ष मीना आणि अंजू चे घाटकोपर ला नोकरी आणि कल्याण ला बस्तान असे चालू आहे, ३ महिन्यातून एकदा सांगली भेट ठरलेली, मीना ची, अंजू ६ वर्षात एकदाच गेली जेव्हा तिचा उरला सुराला परिवार आटोपला, त्यालाही आता ३ वर्ष झाली. 

अंजूला उभ्या उभ्या मस्त डोळा लागला होता ... पुन्हा एकदा दंडाला जोरात पकड जाणवली आणि तिला जाग आली "चला ... आले घाटकोपर, तू पण ना अन्जे, कसलेही टेन्शन नाही तुला... झोपली कशी होतीस अगं तू ?" मीना अंजूला जवळ जवळ ओढत उतराणार्यांच्या लोंढ्यात ढकलत होती. शेवटी दोघी उतरल्या, मीनाने ने पटकन घड्याळाकडे बघितले ८:२२ झाले होते, सगळे अगदी ठरवल्याप्रमाणे वेळेत चालले होते.

"हॉटेल शालीमार चलो भैया ..." अंजू ने रिक्षावाल्याला पत्ता सांगितला आणि दोघी रिक्षेत बसल्या. 
रिक्षेत बसल्यावर मीनाने तिची पर्स उघडली आणि सगळ्या गोष्टी वर खाली करू लागली, "अगं हे तू कितव्यांदा करते आहेस काल पासून ?" अंजूने विचारले. "अन्जे तूला कळत नाही आहे का, माझी नोकरी जाऊ शकते" मीना पुन्हा वैतागली. 
"भैया याहासे लेफ्ट लो, एक शोर्ट कट है, आगेसे राईट फिर आगयां ..., अगं मीने सगळे ओके होईल मी आहे ना" रिक्षा शालीमार हॉटेल जवळ थांबली, दोघी उतरल्या. 

"भैया तुम वेटिंग पे रुको, मीने तू बस मी आलेच जाऊन २ मिनिटात, मग तुला मॉल ला सोडते आणि मी परत स्टेशन वर जाते, हीच रिक्षा पुढे घेऊ" अंजू मीनाला सांगत होती, मीनाचे तिच्याकडे अजिबात लक्ष नवते तिच्या छातीची धडधड वाढली होती, "अगं कळले का तुला राणी?" अंजू पुन्हा एकदा मीनाला हलवत म्हणाली आणि तिला तिने रिक्षेत आत बसण्याचा इशारा केला. 

अंजू आता हॉटेल शालीमार मध्ये आत निघाली. "लवकर ये ग अन्जे ..." मीना इतक्या हळू आवाजात म्हणाली कि हे बहुधा तिच्या पुढ्यात उभ्या असलेल्या रिक्षावाल्याला देखील ऐकू गेले नसेल. बहुधा तिने स्वताला समजूत घातली कि अंजू येईलच २ मिनिटात. 
"ओ ताई गर्दीच्या वेळे आधी इथून बाहेर पडायला पाहिजे, इथून कुठे जायचे आहे?" रिक्षावाला मीनाला विचारात होता. मीनाची त्याच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नव्हती, तिचे पूर्ण लक्षं हॉटेल च्या दरवाज्याकडे होते, तिने पुढचा संवाद टाळण्यासाठी फ़क़्त मान डोलवत "पता नाही भैया ..." असे उत्तर देऊन पुन्हा आपली मान हॉटेलच्या दिशेने वळवली. 

हॉटेल शालीमार हे एक अगदीच साधे लॉज वजा खानावळ वजा हॉटेल होते. विटकरी रंगाची ३ मजली इमारत, जिच्या खिडक्या पिवळ्या रंगात रंगवल्या होत्या, रंग बराच जुना होता आणि गडद असूनही त्यावर लिकेज बुजवलेले ते काळे पांढरे पट्टे अगदी उठून दिसत होते, ते पट्टे बहुधा मागच्या पावसाळया नंतरचे असावेत. हॉटेलचे प्रवेश द्वार देखील अगदी एखाद्या घराच्या दारासारखे होते आणि त्याला बाहेरून लोखंडी शटर होते जे अर्धे उघडे होते. त्या दारापर्यंत जायला ६ कि ७ पायर्या होत्या, त्या पायर्यांवर लाल भडक पायघड्या (पाय पुसण्याच्या) घातल्या होत्या. अजून कचर्याची गाडी बहुतेक आली नसावी कारण त्या पायर्यांवरच एका बाजूला कचर्याचे २ मोठे पिंप होते त्यातून बराच कचरा बाहेर सांडला होता. हे नक्कीच पायार्यान्खाली झोपलेल्या कुत्र्याचे काम असणार. वर हॉटेल च्या नावाची एक पांढरी पाटी होती भली मोठी, त्यावर लाल अक्षरात "हॉटेल शालामार" असे लिहिले होते, ली ची वेलांटी कधीच पुसली गेली होती बहुदा. 

मीनाचे लक्ष उगाच हॉटेल च्या बाहेर लावलेल्या एका जुनाट मारुती ८०० कडे गेली. नंबर मराठीत लिहिला होता "महाराष्ट्र १२ - ए ७४१९".  मीनाची धडधड वाढली ... हि नक्की त्याचीच गाडी असेल. अंजी म्हणाली होती मारुती आहे त्याच्याकडे, आणि पुण्याचा नंबर म्हणजे हो हो नक्कीच त्याची गाडी असणार. गाड्या घोडे सांभाळायला पैसे आहेत मग साल्याला ... 

मीना स्वताशीच बोलता बोलता थांबली कारण तिला अंजू बाहेर पडताना दिसली. ती रिक्षातून पटकन खाली उतरली आणि पळत पळत अंजू जवळ जायला लागली, रिक्षावाला ओरडणार तेवढ्यात त्याला मागच्या सीट वर पर्स दिसली आणि त्याने आवरते घेतले. "आहे का ग अन्जे?" मीनाला धाप लागली होती, "नाही" .... मिनाचा चेहरा अचानक पडलेला पाहून अंजूला कळले कि आपले उत्तर चुकले ती पटकन मिनाचा हात हातात घेऊन म्हणाली. "अगं म्हणजे असेल, रूम बंद आहे आणि शिरीष नाही आहे ..." अंजू अजून पुढे बोलत होती तिला मधेच अडवून मीना म्हणाली "अगं नाही म्हणजे काय? कुठे गेला तो, ती गाडी त्याचीच आहे ना? आणि इतक्या सकाळी कुठे गेला तो? रूम उघडा न म्हणव हॉटेल वाल्यांना त्यांच्या कडे किल्ली असेल कि डुप्लीकेट" ... 

मीना आता जवळ जवळ थरथर कापू लागली होती. "अगं मीने शांत हो, पहिले ती रिक्षा सोड, मी फोन केला होता शिरीष ला हॉटेल मधून तो स्टेशन वर आहे येईलच १० मिनिटात मग रूम उघडेल" अंजू तिची रिक्षा कडे चालत चालत समजूत घालू लागली. "भैया कितना हुआ? आगे नाही जानेका हमको" अंजू ने मीनाची पर्स रिक्षातून काढली आणि रिक्षावाल्याला पैसे दिले. "च्यायला पहिलेच बोलायचे ना, उगाच सकाळी सकाळी टाईम ची खोटी" .... रिक्षावाला उगाचच धुसफुसत मुद्दाम जोरात रेस करत रिक्षा काढून निघून गेला. 

अंजू ने मागे वळून पहिले तर मीना गायब ... तिने इकडे तिकडे पहिले ... मीना हॉटेल शालीमार च्या पायर्या चढत होती ....

अंजू धावत धावत आत गेली, मीना समोरच्या टेबलावर डोक्याला हात लावून बसली होती. एक पोर्या तिच्यासमोर उभा होता. 
"हा म्हणतो आहे मालक नाही आहेत, स्टेशन वर गेलेत, त्यांच्या कडे किल्ल्या आहेत ... अगं काय ग अन्जे तुझा घोळ" आता मात्र मीनाची सहनशक्ती संपत आली होती. 

"ए, जा दोन कप चहा आण आणि मालकांना फोन लाव परत, विचार किल्ल्या कुठे आहेत" अंजू त्या पोऱ्याला म्हणाली आणि तिने हळूच त्याला काहीही न बोलता तिथून निघून जाण्याचा इशारा केला. 

बाहेरून दोन तीन माणसे आत शिरत होती आणि मीना पटकन उठली, अंजूने तिचा हात धरला ... "हे नाही आहेत, बस खाली". 
ती माणसे आत आल्या आल्या डाव्या बाजूच्या जिन्याने वर गेली. तो वरच्या रूम कडे जाण्याचा रस्ता होता, जिन्याखाली "डीलक्स रूम - १२ ते १६" अशी पाटी होती. 

बघता बघता १० मिनिटे झाली आता मात्र मीनाला शांत बसून वाट बघणे अशक्य झाले होते, ती उठली आणि काहीच न बोलता तरातरा हॉटेल मधून भर पडू लागली. 
अंजू ला नेहमी प्रमाणे डुलकी लागली होती. तो पोर्या ओरडला "ताई, त्या गेल्या ...." हे ऐकून अंजू जगाची उडाली आणि तिचे डोके अचानक झोपमोड झाल्यावर जसे गरगरते तसे गरगरले... 
ती तशीच स्वताला सावरत बाहेर आली. पाहते तर मीना रस्यावर रडत रडत उभी होती. 

अंजू पळत पळत तिच्या जवळ गेली "अगं काय ग मीने, अशी निघून का आलीस?" , "झाली का तुझी झोप ? मी जाते मॉल वर, काय होईल ते होईल ... मला उशीर होतो आहे" मीना अंजू चा हात सोडवत म्हणाली. "अत्ताशिक पावणे नऊ वाजताहेत अजून तब्बल तास आहे तुझ्या कडे, अगं शिरीष आत्ता येईल मग वाटल्यास त्याच्या गाडीतून सोडेल तो आपल्याला.." अंजू तिची समजूत काढू लागली.

"गाडीने सोडेल म्हणे, आजवर तुला कधी ..." मीनाने पटकन स्वताला आवरले आणि मन फिरवून रिक्षाला हात करू लागली "रिक्षा रिक्षा ... ". 

"राणी असा नको वागूस, थांब थोडा वेळ ... मी पटकन त्याला परत फोन करते चल". आज अंजूला मोबाईल ची उणीव भासत होती. 

अंजू आणि मीना पुन्हा एकदा हॉटेल मध्ये आल्या. "मी आलेच २ मिनिटात" असे म्हणून अंजू किचन च्या दिशेने गेली ... ते प्रवेश द्वाराच्या अगदी विरुध्ध दिशेला होते. 
मीना पुन्हा एकदा त्याच टेबल वर बसली. वरती पंख सुरु होता तरी ... मीनाच्या कपाळावर आणि ओठांवर घामाचा ओलावा होता. 

मीना सारखे हातातले घड्याळ बघत होती ... ते देखील १५ मिनिटे पुढे होते, रूम वरच्या घड्याळा प्रमाणे. तिच्या डोळ्यासमोर विशाल चा रागीट चेहरा आला. 
विशाल म्हणजे तिचा शारुख ... तो खर तर तिचा मॉल मधील बॉस आणि जुना प्रियकर.... दोघांचे गेल्या तीन साडेतीन वर्षापासून प्रकरण चालू होते. म्हणजे अगदी मीना ने मॉल मध्ये काम सुरु केल्यावर पहिल्या ४-५ महिन्यातच हे सगळे सुरु झाले. 

विशाल देव हा पक्का मुंबईकर आणि दिसायला अगदी शारुख (हि पदवी त्याला अंजूने दिलेली), म्हणजे तसा दिसण्याचा त्याचा प्रयत्न असायचा अगदी केसांना तसेच वळण वगैरे. तो मुलाचा खार चा, तो ह्या मॉल मध्ये गेले ८ वर्ष होता आणि मेनेजमेंट चा खास होता. त्याने अगदी हेल्पर पासून ते आता सेक्शन हेड पर्यंत अगदी कमी वेळात झपाट्याने प्रवास केला होता. मीना हे त्याचे पहिलेच प्रेम, अगदी बघता क्षणी तो मीनाच्या साधेपणावर भाळला आणि मीनाला त्याची हुशारी, रुबाब हे सगळे भावले. मीनाने विशाल ला होकार देण्यास अजिबात वेळ लावला नाही. आणि तेव्हापासून मीनाचे उशिरा जाणे, लवकर निघणे, सांगलीला जायला सुट्ट्या टाकणे, अश्या बर्याच गोष्टींमध्ये तिला विशाल ची साथ होती. त्यामुळे हे सगळे करूनही तिचा मॉल मधील आलेख चढताच होता. 

पण आजची गोष्ट वेगळी होती, विशाल ला हे सगळे कळले तर? मीनाने कपाळावरचा घाम टिपला ...

अचानक अंजू किचन मधून धावत येताना मीनाला दिसली, "मीने तू पटकन बाहेर जा, रिक्षा पकड, वेटिंग वर ठेव, मी आलेच", अंजूला धाप लागली होती. 
"अगं म्हणजे काय आला का शिरीष? काय झाले? मिळाले का?" मीना अंजू ला विचारात होती, अंजूने मिनाचा दंड धरून तिला उठवले आणि हॉटेल बाहेर नेऊ लागली.
"थांब अन्जे अगं काय चालू आहे सांगशील का मला?" मीना तिचा हात सोडवत म्हणाली.
"हे बघ मीने मी आलेच २ मिनिटात आपले काम झाले आहे, तू आता इथे थांबू नकोस फक्त ऐक माझ ..." अंजू हे तिला हात जोडून विनवले ....

तितक्यात मीनाला किचन मधून सावंतांचा आवाज आला ... इन्स्पेक्टर सावंत ... मीना लगेच पळत बाहेर जाऊ लागली "अन्जे एक दिवस जीव घेणार आहेस तू माझा ...."
"तू साळवी मावशींना फोन कर, मला रूम ची किल्ली मिळाली आहे मी मॉल च्या बाहेर अर्ध्या तासात भेटते, तू निघ ..." अंजू डावीकडच्या "डीलक्स रूम" च्या जिन्यावर चढता चढता ओरडली....

मीना पळत पळत बाहेर पडली, ती समोरच्या वालापर्यंत पळतच गेली, जीव मुठीत धरून. पुढे डावीकडे वळल्यावर तिने थोडा दम खाल्ला आणि आजू बाजूला रिक्षा आहे का शोधू लागली. तेव्हा सकाळचा रिक्षावाला पुन्हा समोर हजर. "ताई जायचे का कुठे ?" 

मीनाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली... हा इथे परत कसा काय ? .... रिक्षावाल्याने होर्न दिला जोरात "ताई ... यायचे आहे का ?" मीनाने पुन्हा एकदा त्या रिक्षावाल्याकडे बघितले आणि काही न बोलता ती रिक्षेत बसली. 
"रेव्हेल्युशन मॉल, आर सिटी, एल बी एस मार्ग .... अं ...." मीना ४ सेकंद थांबली अन पुन्हा म्हणाली "....नाही मॉल लाच चला ...", रिक्षा वाल्याने जोरदार रेस केली आणि तो भरधाव निघाला.

इथे अंजू पळत पळत वर आली, तिने रूम नंबर १३ उघडली ... तेव्हा उगाच १३ हा आकडा तिला खटकला ... ती आत शिरली रूम अगदीच सैरभैर झाली होती ... 
ती ४ पावले आत गेली आणि तिच्या लक्षात आले, दार उघडेच राहिले, ती मागे वळून दार लावणार तर दारावर सावंत उभे. ते काही बोलणार तितक्यात अंजूने दार जोरात त्यांच्या तोंडावर आपटले.

मीना नुकतीच मॉल वर पोचली ती मागच्या दरवाज्याशी उतरली ... कारण पुढच्या मेन दरवाज्याशेजारीच स्टाफ चा दरवाजा होता ...
अंजू येई पर्यंत तिला कोणी पाहावे अशी तिची अजिबात इच्छा नव्हती. तिने पुन्हा घड्याळ बघितले ९:४० ... म्हणजे ९:२५ झाले होते मीनाने मनातच हिशोब केला. 
विशाल ची नेहमीची वेळ १० होती ... म्हणजे तसा अजून अर्धा एक तास होता. साळवी मावशींना फोन करायला म्हणून मीना जवळच्या पान शॉप वर निघाली.

"दार तोडता येते आम्हाला ... असे काही करायला लाऊ नका ..." सावंत बाहेरूनच ओरडले ... त्यांनी आपले पिस्तुल हातात घेतले आणि उगाच त्याची उघड मिट केली ...
अंजू ने दार उघडले आणि ती हळू बाहेर चालत आली .. सावंत आणि हवालदार ढेरे कि ढोरे ... दोघे बाहेर उभे होते ... 
"चलायचे का ?" सावंतानी अंजू च्या दंडाला धरले ... "ढोरे, रूम बघा तपासून मी गाडीत बसतो ..."
अंजू गाडीत अगदी सवयीने तिच्या नेहमीच्या जागेवर जाऊन बसली. सावंत पुढे बसले, "थांब रे, ढोरे येतोय" सावंतानी ड्रायव्हर ला सांगितले.
"साहेब एक फोन करू का ?" अंजूने मुद्दाम ड्रायव्हर ला विचारले...
"कमिशनर ना करायचाय ? नाहीतर एक काम करू शेलार, आज बाईना घरीच सोडू ... काय ?" असे म्हणत सावंतांनी समोरचा पोलिसी दांडका उचलला आणि जोरात जीप च्या मध्य भागाच्या लोखंडी पार्टिशन वर मारला ... अंजू दचकली ....
सावंत साहेबांचा मोबाईल वाजला, ते गाडीतून खाली उतरले "बोला साहेब ...." 
शेलार ने मागे वळून अन्जुकडे पहिले ..."काय अंजू, कधी सुधारणार तू ?"

मीना पब्लिक फोन वरून बोलत होती "मी मॉल च्या मागच्या बाजूला आहे, गणेश पान शॉप जवळ..., ठेवते मावशी, तेवढे जरा लवकर ....", तोवर पलीकडून मावशींनी फोन ठेवला होता.
पुन्हा दुकाना बाहेर येऊन मीनाने आपल्या कपाळाचा घाम टिपला आणि घड्याळातला सेकंद न सेकंद मोजायला सुरुवात केली ...

====================================================================================================================
सावंत साहेब परत आले, बरोबर ढोरे होते .... "चला बाई, तुमची वरात काढायची गरज नाही..., ढोरे वार्निंग देऊन सोडा बाईना"
"आयला ह्या असल्या बायाकांकर्ता कमीशनरांचे फोन ... काय दिवस आलेत ढोरे ... आपण पण पावडर लाली लाऊन धंद्याला बसू च्यायला आपल्यपेक्षा ह्यांना जास्त डिमांड आहे"
या नेहमीच्या वाक्यावर ना ढोर्यांना हसू आले ना शेलारांना ... मागचे दार उघडून हवालदारांनी अंजू ला खाली उतरण्यास सांगितले.

अंजू काही न बोलताच उतरली, शेलारांकडे पाहून किंचित हसली, शेलारांनी तिच्या कडे बघून न बघितल्यासारखे केले आणि गाडी स्टार्ट करून ते निघाले.  
काही सेकंद अंजू त्या जीप च्या धुरात मिसळली आणि जसा तो धूर विरत गेला तशी ती भानावर आली .... 
भराभर चालत ती चौकात आली, "रिक्षा रिक्षा ...." दिसेल त्या रिक्षेत बसली "चलो भैया, आर सिटी, एल बी एस मार्ग, भगावो ...." 
अंजूने स्वताच रिक्षेचा मीटर चालू केला. रिक्षा भरधाव वेगाने सुटली, नेहमी प्रमाणे अंजू रिक्षावाल्याला माहिती असले तरी सगळी वळणे सांगत होती, शोर्ट कट म्हणून ....

१० ला ५ मिनिटे बाकी होती ... अंजूचा अजून पत्ता नाही म्हणून मीना त्रासली होती ... पुन्हा एकदा साळवी मावशींना फोन करावा का ? ... नको त्या रागावतील ... 
मीनाचे लक्ष गळ्यातल्या आय कार्ड कडे गेले आणि एक छोटासा अश्रू तिच्या डाव्या डोळ्याची सीमा ओलांडून गालावर ओघळला .... 
तो तिने पटकन टिपला आणि अपराध्यासारखे चारही दिशेना पहिले, कोणी ओळखीचे तर नाही ना आसपास ....

एव्हाना अंजूची रिक्षा मॉल बाहेर थांबली ... "भैया २ मिनिट रुको, मी पैसे घेऊन येते ... " असे म्हणत ती रीक्षेवाल्याने आक्षेप आणावा त्याच्या आत मॉल च्या दिशेने पळाली .... 
आत आल्या आल्या तिला नेहमीचा वॉचमन दिसला, "अरे दीदी, मीना दी नाही आई अबतक ... आप बैठो उधर ..." 

"काय !!! ", हे ऐकून मात्र अंजू चे हात पाय गार पडले ....

"आता हि कुठे गेली असेल ? हि न मुलुखाची घाबरट ... परत शालीमार ला तर नाही न गेली ... नाही नाही, साळवी मावशींना फोन केला पाहिजे त्यांना माहिती असेल ....", असे म्हणून ती मागे वळली ... 
आणि विशाल ला धडकली ....

"अगं पोरी ... जरा हळू हळू हळू हळू चाल ...." विशाल ने नेहमी प्रमाणे त्या धक्क्याचा पूर्ण आस्वाद घेतला आणि त्याने अंजूला दोन्ही हाताने सावरले ...
"आज काय तू सोडायला वगैरे आली होतीस कि काय मिनू ला ?" विशाल प्रेमाने (किवा फक्त एकांतात आणि अंजू समोर) मीनाला मिनू म्हणून हाक मारतो ...
अंजूने पटकन स्वताला सावरले, काय बोलावे तिला सुचत नव्हते, तितक्यात तिचे लक्ष मागे उभ्या रिक्षे कडे गेले ... 
"अरे नाही ... मी इथे कामानिमित्त आले ... रिक्षा केली आणि नंतर लक्षात आले कि पर्स विसरले, म्हणून मिनेकडून पैसे घ्यायला आले ... तर बाईसाहेब अजून आल्याच नाहीत, लोकल हुकली बहुतेक राणीसाहेबांची ..."

"अगं इतकाच न ... थांब मी देतो त्याचे पैसे, भैया कितना हुआ ?" ... असे म्हणत विशाल ने झटकन आपला मोठेपणा पैसे देऊन सिद्ध केला ...

अंजूचे त्याकडे अजिबात लक्ष नव्हते, 'आता ह्या मीनेला कुठे शोधायचे ... हा .. मावशींना फोन ...' 

"बर अजून एक काम, चल ना मला जरा घरी मावशींना फोन करायचा आहे, त्यांचेच काम होते, झाले कि कळव असे म्हणाल्या होत्या ..." 
"अगं रिचार्ज करायला विसरलो ग ...", विशाल ने स्वताचा मोबाईल काढून नुसताच अंजू च्या पुढ्यात नाचवला. 
"चल बूथ वरून करू ...", अंजू विशाल ला ओढत ओढत दुकानापाशी जाऊ लागली .... मीनाच्या आधी हा मॉल मध्ये जाऊ नये ह्याची जबाबदारी आता अंजूवर होती.
मॉल ला थोडा वळसा घालून दोघे गणेश पान शॉप कडे वळाले .... आणि लांबूनच अंजूला मीना दिसली ... फोन वर कोणाशी तरी बोलत होती ... अंजू चा जीव भांड्यात पडला ....
अरे ती बघ मीना .... असे म्हणत धावत अंजू मीनाच्या दिशेने गेली ... विशाल मागेच राहिला ... आणि चक्क तिने मीनाला करकचून मिठी मारली ... 
मिनाचा देखील बांध तेव्हा फुटला आणि ती ढसा ढसा रडू लागली ...

विशाल चालत चालत त्यांच्या जवळ आला आणि मीनाच्या पाठीवर हात ठेऊन म्हणाला ... "अगं काय झाले ... तू अशी रडती का आहेस ?" 
अचानक आलेल्या विशाल ला पाहून मीनाचे हात पाय च गळाले ....

पुन्हा एकदा अंजूने सावरून घेतले ... "अरे सकाळी सकाळी हिच्याशी भांडून मी घरातून निघून गेले ...", अंजूने मिठी सोडली, मीनाचे दोन्ही हात हातात घेतले  
"त्यामुळे राणीसाहेब चिडल्या होत्या ... आत्ता पण मावशिंकडे माझी चुगली सांगत असणार ... काय ग मीने ?" 
मीना काहीच बोलली नाही .... विशाल ने तिच्या पाठीवरून हात फिरवला ... 

ते तिघेही आता मॉल च्या प्रवेशद्वारा कडे निघाले ... अंजूने हळूच तिच्या ड्रेस मध्ये लपवलेली एक छोटी पर्स काढून मीनाच्या हातात दिली ... 
"क्या शारुख चाय नाही पिलायेगा क्या ? ... " अंजूने विशाल च्या खांद्यावर थाप देऊन विचारले ...
"चलो ... आज मेरी तरफ से ... " असे म्हणून तो मॉल च्या विरुध्ध दिशेला असलेल्या टपरी कडे वळाला ... 

"मीने तू जा हजेरी लाऊन ये .... बॉस चाय पिला रहे है ...." अंजूने मिनाचा हात हातात घेतला, त्यावर दिलास्याची थाप दिली .... आणि सोडला ....
काहीच न बोलता मीनाने तोंड फिरवले आणि मॉल च्या दिशेने निघाली ....

ते मॉल पर्यंतचे चार पावलांचे अंतर चालताना मीनाला कालची रात्र पुन्हा एकदा आठवली आणि तिने ती पर्स घट्ट हातात धरली ...

कालची रात्र -
=========

"चला मीने मी निघते, साळवी काकुनी कालवण दिले आहे ते इथे वाटीत आहे ... आज दोन गीर्हाईक आहेत, एक साळवी काकुंचे ते वकील ... त्यांचे आटोपून मग घाटकोपर ला जाईन ... शिरीष आला आहे आज दुसरा शनिवार ... साहेबांना सुट्टी असते" 
"अन्जे आज बघ मी कोणती लिपस्टिक आणली आहे, किंमत माहिती आहे का ... ४५० रुपये ... मेबलीन ग्लीटर..., मस्त दिसेल तुला आणि दोघेही खल्लास होतील ..., बाकी नेहमीचे समान आहेच ह्या पर्स मध्ये ..." मीनाने एक छोटी पर्स दिली अंजूच्या हातात ...
अंजू ने पर्स उघडून ती लिपस्टिक बाहेर काढली ... "फॉर टेस्ट ओनली" असे लिहिले होते ... अर्थात ते मीनाने आणलेल्या सगळ्याच मेकप च्या सामानावर लिहिलेले असते ... तिने लिपस्टिक लावली आणि मीनाकडे बघून एक डोळा मारला.

"हा पत्ता ... " साळवी काकू दारात उभ्या होत्या ... 

अंजूने मागे वळून न पहाता तो कागद त्याच पर्स मध्ये कोंबला आणि ती निघाली ... साळवी काकुनी मीनाकडे बघितले ... त्या उगाच खोचक हसल्या आणि निघून गेल्या .... 

मुंबई मधील राहण्याच्या आणि नोकरीच्या समस्येवरचे साळवी मावशी हे एकच उत्तर सध्या त्यांच्याकडे होते ....

आज -
====
मीनाने पर्स उघडली ... सगळे मेकप चे टेस्ट करायचे सामान काढले आणि हळूच कोण पाहत नाही हे बघून जगाच्या जागी लावून टाकले ... 
तिच्या हाती साळवी काकूंच्या वकिलाचा पत्ता असलेली चिठ्ठी लागली ... ती उघडून बघायची मीनाची हिम्मत झाली नाही, तिने ती तशीच फाडली आणि फेकली, 

हताश होऊन तिने हात समोरच्या कौंटर वर टेकले, त्या काचेच्या कौंटर वर तिला तिचाच चेहरा दिसला ... अजून एक अश्रू ओघळला आणि मीनाची ती काचेवरील प्रतिमा विस्कटली .....

- समाप्त -
- विश्वेश 

शनिवार, २३ जुलै, २०११

पती पत्नी और वो आणि लॉंग ड्राइव्ह ....

हा एक स्वानुभवाचा केलेला कल्पनाविष्कार आणि कल्पनाविस्तार आहे ... याचा कुठल्याही हयात व्यक्तीशी संबंध आढळल्यास मी तुमच्या दुख्खात सहभागी आहे आणि देव तुमचे भले करो ....

"डाडू ..... मला डाडू पाहिजे ....भ्या ssssss" मी जरा पान घ्यायला गाडीतून खाली उतरलो आणि मागून आमचे चिरंजीव ओरडले .... झाले ... कधी नव्हे तो आज बायकोने हट्ट केला कि "लॉंग ड्राइव्ह ला जाऊ, पान खाऊ" 
शेवटी आला माझ्या मागे .... तिथे पान टपरी वर ... प्रत्येक गोष्टीकडे बोट करून ... "हे काय आहे ? हे कोण आहे ? हे काका शी शी आहेत का ? हे असं का बर करतात ?" असे न संपणारे प्रश्न सुरु झाले ... "भाऊ, लहान पोराला कशाला टपरी वर आणता ... आत्ता पासून सवय लावता कि काय ... काय राव तुम्ही पण ...", नेहमीच्या पानवाल्याने असा फालुदा केला ... आता तू दिलेले पान काय रंगणार ... श्या ! त्या नेहमीच्या झक्कास पानाला आज कडू लिंबाची चव लागली ...  

बर कार्ट्याने मस्त चेरी चा तोबरा भरला होता आणि जोर जोरात मी पान खाल्ले मी पान खाल्ले असा उदो उदो चालू होता ... आजू बाजूच्या लोकांच्या त्या घृणौतुक नजरा चोरत मी पटकन गाडीत शिरलो आणि गाडी भरधाव वेगाने पिटाळंण्यास सुरुवात केली. थोडे पुढे गेल्यावर पहिले तर चिरंजीव पुन्हा स्वतामध्ये गुंगले होते आणि बडबडगीते चालू होती ... "जिलेबी बाई कि काय ..." चला हा मौका साधून बायकोच्या तोंडात पान भरवावे म्हणून गाडीचा गेयर बदलला ... अलगद पानाची पुडी उघडली ... आणि पान भरवणार तितक्यात माझ्या बायकोला मागे टाकून तिच्यातली आई संचारली आणि म्हणाली ... "माझ्या पिल्लुने खाल्ले का पान? अजून पाहिजे ?" असे म्हणून माझ्या हातातून जवळ जवळ हिसकावून घेतले पान ... एक तुकडा पोराला भरवला आणि उरलेले स्वत खाल्ले ... झाल हा चान्स पण गेला. माफ करा पण अश्या रागारागात ते पान गुंडाळलेले कागद मी रस्त्यावर फेकतो हो ... एरवी ओला कचरा आणि सुका कचरा अगदी नेमून दिलेल्या बादलीत असतो ... पण तुमचा असा कचरा झाल्यावर .... 

काही गप्पा माराव्यात निवांत म्हणून कुठलाही विषय काढला ... कि त्यातले नको ते शब्द बरोबर पकडून ... "मम्मी ... कहर म्हणजे काय ? मम्मी ... च्यामारी म्हणजे काय ? डाडू अवसान म्हणजे काय ? ..." अरे देवा ! आमच्या कडे एक भली मोठी यादी आहे "कोणते शब्द कार्टे जागे असताना बोलायचे नाहीत" ह्याची !! ती यादी इथे देणे केवळ अशक्य आहे कारण ती अजून evolving आहे .... (कहर, आवरा, च्यायला, मायला तत्सम सगळे शब्द, जाब, जबाबदारी, कर्तव्य, सासू, सासरे, छळ, पळ, मळ इत्यादी इत्यादी ...), 

बायकोने एक नेहमीचा इशारा केला .... म्हणजे चला आता हे कार्ट झोपेपर्यंत वेळ, इंधन आणि इच्छा सगळे जाळत फिरत राहा ... च्यामारी लॉंग ड्राइव्ह ... !! 

मंगळवार, १९ जुलै, २०११

वरचा "सा" - आमची लग्नाष्टमी !

आज आमच्या लग्नाचा आठवा वाढदिवस ..... 
आज आमच्या संसाराच्या सुरावटीने वरचा "सा" गाठला ... 

पहाटे पहाटे उगाच मला पल्लवी जोशी चा भास झाला ... आणि ती कर्ण कर्कश्श आवाजात ओरडली "एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, वरचा "सा", वाः क्या बात  है !".  मी आपले सगळे स्पर्धक करतात तसे खोटे खोटे "हि हि हि, धन्यवाद" वगैरे केले ... आणि उठलो. पहिले तर गेल्या आठ वर्षातले सगळे चढ उतार समोर परीक्षक म्हणून उभे होते ... अनेक वेळा डेनजर झोन मधून बायकोच्या साथीने मी शिताफीने बाहेर आलो ... कित्येक वेळा फ़क़्त तिच्याच मतांचा आधार होता. दिवसाची अशी अपेक्षित सुरुवात झाल्यावर कसे अगदी routine मध्ये असल्यासारखे वाटते ... हायसे वाटते ... बाजूला पहिले तर आमची द्वंद्व गीताची साथी (संसाराच्या गाण्याला किती चांगले रूपक आहे हे ... द्वंद्व गीत) आणि आमचा एकमेव हक्काचा प्रेक्षक दोघेही अजून झोपले होते .... मी पटकन विचार केला ... च्यायला एखादे फुल बिल आणून बायकोच्या उशीखाली ठेवावे ... पण तिने सवयीने उठल्यावर तिने जोर जोरात उशी झाडली ... तर उगाच चुराडा ... surprise चा पण आणि फुलांचा पण ... जाऊदे आपल्याला असे करावेसे वाटले ह्यातच सगळे आले ... आई शप्पत मी हे सगळे मनात बोललो होतो ... पण कसे काय माहिती नाही ... बायको झोपेतच हसली ... आणि पोराने नेहमीप्रमाणे तिचे "च" अनुकरण केले .... 

मी आपले दुधाची पिशवी घेतली, चहाचे आधण ठेवले ... खरच नेहमी पेक्षा आज वेगळे वाटत होते ... म्हणजे शरीर नेहमीच्याच कृती करत होते पण आज ते करतानाचे frustration नव्हते ... घाई नव्हती ... खरच ८ वर्षापूर्वी जन्मास घातलेले "नाते" आज मोठे झाले.... mature झाले ... श्या पुन्हा उगाचच जमीन हादराल्याचा भास झाला .... आणि निर्मिती तैंचा आवाज ऐकू आला ... "विनोद" मोठा झाला ..... आता बास झाले ... हे कार्यक्रम पहाणे बंद केले पाहिजे ... असे पुन्हा एकदा मी स्वताला बजावले .... चहा ओतू गेला .... एरवी गाढ झोपेत असणारी बायको नेमकी चहा आपल्या हातून ओतू गेल्यावर बरोब्बर मागे कशी काय उभी असते काय माहिती ... पण आज ती नव्हती ... (अरे वा आज नशीब पण साथ देत आहे ...) असुदे ... सगळे आवरून नेहमी प्रमाणे बायकोला office ला सोडले, पोराला शाळेत सोडले ... आणि स्वता टपरीवर चहाचे झुरके घ्यायला सुरुवात केली ...

लग्नाचा आठवा वाढदिवस ..... 
नक्की काय वाढते ह्या दिवशी ... एकमेकावरील प्रेम ? जिव्हाळा ? नात्याची दृढता ? वगैरे वगैरे .... हे फार पुस्तकी झाले ... मला विचाराल तर वाढतो एकमेकाबरोबर जगण्याचा अनुभव !  आणि कुठल्याही गोष्टीचा अजून १ वर्ष अनुभव वाढला कि आपोआप तुमचा आत्मविश्वास वाढतो Domain Expertise वाढतात ! अर्थात बायको हे Domain इतक्या झपाट्याने बदलत असते कि upto date राहण्याचे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरतात.  ह्याच्यावर अनेक गोष्टींचा प्रभाव असतो अगदी सारासारपणे अनेक दिवस विचारपूर्वक घडवून आणलेला बदल किवा वृद्धी  (अपेक्षान्मधली) ते अगदी एखाद्या मैत्रिणीने नुकताच उपभोगलेला तिचा लग्नाचा वाढ-दिवस.  असो आज हे बोलायचा दिवस नाही ... उद्यापासून आहेच ....

पण खरच "एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, वरचा "सा", वाः क्या बात  है !" ... भैया और १ कटिंग .... और आज क्रीम रोल भी दो ....