रविवार, २८ एप्रिल, २०१३

दोन दिवस


माझ्या सर्व कर्जबाजारी मित्रांकरिता  - (स्पेशली होम लोन वाले)
-------


दोन दिवस भाड्यात गेले, दोन दिवस हफ्त्यात गेले
हिशोब करतो आहे आता पैसे किती हे खात्यात उरले !

शेकडो वेळा पगार आला, आशा फुलल्या, मनं धुंद झाली
घराच्या खिडकीतून चंद्र बघण्यातच जिंदगी बर्बाद झाली

नोकरी हेच माझे सर्वस्व, कर्जाकडे गहाणच राहिली
कर्जापुढे मान न उंचावता, सदा कलम झालेली पाहिली

हरघडी एफड्या मोडल्या नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा एफड्याच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

कर्जाचा विचार हरघडी केला अगा कर्जमय झालो
कर्ज घ्यावे कसे, पुन्हा भरावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस भाड्यात गेले, दोन दिवस हफ्त्यात गेले.

- विश्वेश



मूळ कविता - 

दोन दिवस

दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले.


कवी - नारायण सुर्वे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: