गुरुवार, १ फेब्रुवारी, २०१८

आय एम अलाईव्ह (कथा)

"माझे नाव डॉ. मिलिंद बापट आणि सध्या माझ्या अभ्यासाचा विषय आहे इरा जमेनीस वय वर्ष १५ राहणार कोथरूड पुणे महाराष्ट्र भारत. इरा जर तु हे वाचत असशील तर माझा शोध घेऊ नकोस मी कधीच संपलो असेन" इराला हे वाचून धक्काच बसला ... कोण हे डॉ बापट ? तिने हे नाव आधी कधीच ऐकले नव्हते. या डायरीचे पुढचे पान वाचायला खरं तर तिचे धाडस होत नव्हते ती पटकन तिच्या रूम मध्ये गेली दार आतून लावून घेतले, मोठ्याने स्पीकरवर गाणे लावले आणि आपल्या स्टडी टेबल वर बसली. १५ मिनिटांपूर्वी इराच्या नावाने कुरियर आले होते ते आईने इराला दिले त्यात एक डायरी होती, तिला वरून नवे कोरे कव्हर होते परंतु इराने आत बघितले तर पानं बरीच जुनी होती. सगळं बळ एकवटून ती पुढे वाचू लागली
१४ सप्टेंबर २०७१ ... इरा नकळतच भूतकाळात गेली ... 

त्या दिवशी इराला हे असं सगळ्यांशी खोटं बोलणं सहन नव्हते होत, शेवटी तिने तिच्या जिवलग मैत्रिणीला राधाला सांगितलेच "हो आहे मी नॅचरल, साधी ! तुमच्यासारखी डिझायनर नाही ! पण म्हणून मी फ्रेंड म्हणून कधी कमी पडले का ? तूच सांग" राधा आधी तर शॉक मध्ये गेली, तिला कसे रिऍक्ट व्हावे हेच कळेना, हि खरंच नॅचरल असेल ? म्हणजे कुठले आईबाप अशी नॅचरली पोरं जन्माला घालतात ? धिस इस सो २०२० ! आता २०७० मध्ये असे कोण करते ? पटकन राधा पावले मागे सरकली. इराने हातात घेतलेला हात तिने सोडवला आणि कृत्रिम हसतच तिने विचारले "यु आर जोकिंग राईट ? कम ऑन इरा धिस इस नॉट फनी. उगाच काहीतरी बोलू नकोस. हा हा टॅग कसा काय मग ?" इराने पटकन आपल्या मानेवर मागच्या बाजूला असलेला टॅटू सारखा दिसणारा बार कोड नखाने खरवडून काढला. ते पाहून मात्र राधा हादरते आणि तिथून निघून जाते. इरा फक्त राधा राधा एक माझे ... एवढे ओरडत राहिली. 

डायरीत ह्या दिवशी फक्त "सीझ राधा मालवणकर ... " इतकेच लिहिले होते ... बापरे म्हणजे ... आता मात्र इराला दरदरून घाम फुटला होता, म्हणजे माझ्यामुळे राधाला ह्या लोकांनी? ... नाही नाही नंतर अनेक वेळा ती फेसबुक वर ऑनलाईन होती स्टेटस टाकत होती इन्स्टा वर तिचे फोटो पण होते ... मग ? सीझ म्हणजे काय ? 

तिने पटापट डायरीची पाने उलटली १२ ऑक्टोबर पर्यंत त्याच्यात फक्त हिंदी जुनी पुराणी शतकांपूर्वीची कोणीतरी किशोर आशा वगैरे गायकांची गाणी लिहिली होती आणि त्याची नोटेशन्स होती 

१२ ऑक्टोबर २०७१ 
"सीझ इरा जमेनीस" आणि पुढे दुसऱ्या पेनने खरवडून घाई घाईत "PTO पेज नं १२४" इतकेच लिहिले होते ... म्हणजे? आज तर २० नोव्हेंबर आहे १२ ऑक्टोबरला तर असे काही झालेच नाही? इराने पटकन पेज १२४ काढले तर तिथे पुढची काही पाने खरवडून त्यात एक छोटासा कप्पा करून एक किल्ली ठेवलेली होती. हि किल्ली इराच्या ओळखीची होती. तिच्या शाळेतल्या लॉकरच्या किल्ल्या अश्या होत्या. चपटी निळ्या रंगाची डिजिटल डिस्प्ले असलेली किल्ली त्याच्यावर डबल टॅप केले कि लॉकर नंबर दिसायचा. इराने डबल टॅप केले तर लॉकर नंबर ११४ ओह शीट ! हि तर राधाच्या लॉकरची किल्ली. इरा पुन्हा १० वेळा ती डायरी चाळून काढते पण हिंदी गाणी आणि नोटेशनशिवाय त्यात काहीच तिला दिसत नाही. म्हणजे आता त्या लॉकर मधेच काहीतरी असणार. इरा तडक उठते आणि घरातून बाहेर पडते, पडताना घरातल्या व्हॉइस असिस्टंटला सांगते "बेकी टेल मॉम आय एम गोइंग टू राधाज प्लेस, विल बी बॅक बाय डिनर" बेकी उत्तर देते "शुअर डियर यु वॉन्ट मी टू टेल राईट अवे ऑर इन १५ मिनिट्स लाईक ऑल्वेज?" ... "ऑफकोर्स इन १५ मिनिट्स" असे म्हणून राधा बाहेर पडते. आईचे प्रश्न चुकवण्याकरता नेहमीच इरा असे करत असे. 

इरा शाळेत पोचते तेव्हा तिथे फारशी मुलं नसतात. सगळा अभ्यास ऑनलाईन असल्याने शाळेत फक्त प्रॅक्टिकल करताच यावे लागते म्हणा ... इरा पटकन लॉकर रूम मध्ये जाते तर तिथे मिट काळोख. "इथली मोशन सेन्सर सिस्टीम नेहमीच बंद असते काय यार शीट" असे म्हणून इरा मॅन्युअल ओव्हरराईड स्विच चालू करते. एव्हाना मुलांना शाळेतले सगळे मॅन्युअल ओव्हरराईड स्विच माहिती झाले होते. इरा आसपास कोणी नाही याची खात्री करून राधाचा ड्रॉवर उघडते आणि आत डोकावते तर आत तिला एक कॅमेरा बसवलेला दिसतो तो कॅमेरा चालू आहे हे त्याच्यावरच्या निळ्या लुकलुकणार्या लाईट वरून कळते आणि पटकन त्या ड्रॉवर मधुनन कसलाच स्फोट होतो आणि एक जाड पाकीट इराच्या दिशेने भिरकावले जाते. इरा जोरात घाबरून ओरडते पण काही सेकंदात स्वतःला सावरून ते पाकीट उचलते. उघडून बघते तर काय अगदी घरी आली तशीच डायरी. आता हे आणि काय ... तेवढ्यात तिला कोणाच्यातरी येण्याची चाहूल लागते त्यामुळे ती तिथून सटकते. 

घरी येऊन ती डायरी उघडते. डॉ मिलिंद बापट यांनी त्यांच्या सगळ्या प्रोजेक्टसची माहिती यात लिहिलेली असते. ते जेनेसिस इंटरनॅशनल नावाच्या रिसर्च कंपनी मध्ये डॉक्टर म्हणून काम करत असतात पण खरं म्हणजे ते "नॅचरल बेबी हंटर" असतात. बापरे ... इराने आत्तापर्यंत अश्या लोकांबद्दल फक्त वेब सिरीज आणि पुस्तकांमध्ये ऐकले होते. यांचे काम नॅचरली कन्सिव्ह करून नॉर्मल जन्माला आलेल्या मुलांना शोधून त्यांना टॅग करून समाजात सामावून घेणं हे असते. इतक्यात इराच्या खोलीत प्रचंड मोठा आवाज झाला मोठा प्रकाश पडला आणि सगळी खोली हादरली. आई पळत पळत वर आली आणि दार उघडून आत आली तर आत इरा नव्हती ... फक्त एक स्माईली फेस वाला पिवळ्या फुग्यांचा गुच्छ होता. आई हताश झाली खाली बसली आणि जोरजोरात रडू लागली आणि ओरडू लागली "ओह मिलिंद व्हॉट हॅव यू डन ...". तिला कळले होते कि आता तिला इरा पुन्हा कधीच भेटणार नाही ... निदान प्रत्यक्ष तरी ...  तिला मिलिंदने ह्या बद्दल सगळे सांगितले होते

========================================================================

२०७१ साली नॅचरली कन्सिव्ह करून नॉर्मल बाळे जन्माला घालणे खरंतर बेकायदेशीर कारण अश्या मुलांना कंट्रोल कसे करणार? त्यांच्या ऍक्शन्स, रिऍक्शन्स सगळेच कसे अनप्रेडिक्टबल, कोण कसे वागेल याचा भरवसा नाही. शेवटी कुठल्याही देशाला गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार मुक्त बनवण्यामध्ये संपूर्ण लोकसंख्या हि जेनेटिकली मॉडिफाइड आणि सेन्ट्रली कंट्रोल्ड हवी म्हणजे कसे सगळे अगदी ठरल्याप्रमाणे घडते. इथपर्यंत पोचणे इतके सोपे नव्हते. २०२२ साली झालेल्या केमिकल वॉर आणि त्यातून झालेल्या प्रचंड मानवजाती संहारानंतर जगातील महासत्तांच्या अध्यक्षांनी एकत्र येऊन वैश्विक शांतता करारावर स्वाक्षरी केली आणि त्याची अंमलबजावणी म्हणजे उरलेल्या लोकसंख्येला आणि इथून पुढे तयार होणाऱ्या सगळ्या लोकसंख्येला जेनेटिकली मॉडिफाय करायचे आणि सेंट्रली कंट्रोल करायचे. फक्त २३% लोक यातून वाचले होते. त्यातही बरेच जण घाबरलेले असल्याने अंमलबजावणी करण्यात फार अडचण आली नाही. ज्यांनी विरोध केला त्यांना संपवण्यात आले. २०४० पर्यंत हि प्रक्रिया चालू होती. त्यानंतर जन्मलेल्या सगळ्यांकरिता त्यांना पटेल असा आणि पचेल असाच इतिहास रचला गेला आणि सांगितला गेला. वयाच्या , १५, २५, ४०, ५५, ७०, ८५  व्या वर्षी तुमच्या डीएनए टेस्ट करून तुम्हाला टॅग केले जायचे अगदी गाडी सर्विसिंग करतो तसेच. हे सगळे चालू असताना जमेनीस कुटुंबाने आपल्या मुलीला ह्या सगळ्याहून वेगळे ठेवले तिचा नॅचरल जन्म झाला. ह्यांचा अश्या लोकांचा एक कल्ट होता, सिक्रेट सोसायटी ... जमेनीस कुटुंबाना अपत्य होत नसल्याने त्यांनी सीमन विकत घेऊन बेबी इम्प्लांट केला होता. आपला सिक्युरिटी क्लियरन्स वापरून डॉ मिलिंदना माहिती होते कि इरा हि त्यांचीच मुलगी आहे. त्यामुळे त्यांनी सर्वप्रथम हे सत्य इराच्या आईला अंजलीला सांगून नंतर वडिलांचे ब्रेनवॉश करून त्यांना ह्या कल्ट मध्ये सामावून घेतले होते. इरा योग्य वयात आली कि तिला मी सगळे सांगेन असे त्यांचे म्हणणे होते. मिलिंदला भरवसा होता कि तो नॅचरल जन्माला आलेल्या मुलांनापण तितक्याच लीलया कंट्रोल करू शकणाऱ्या त्याच्या शोधात यशस्वी होईल आणि त्यांना सध्या जे बऱ्याच मुलांना मधूनच सीझ करावं लागत ते करावे लागणार नाही. पण त्या आधीच त्याच्याकडे इराला सीझ करायची ऑर्डर आली आणि तो बिथरला. वास्तविक पाहता चूक अंजलीची होती. इरा १० वर्षाची असताना बाकीच्या मैत्रिणीप्रमाणे आपण नाही हे तिला कळायला लागले आणि ती कोशात गेली पुढे त्याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये झाले आणि एका भवानी क्षणी अंजलीने तिला ती नॉर्मल बर्थ असल्याचे सांगितले. त्याने इरा या कोषातून बाहेर पडली परंतु आतून बाहेरून हादरली. शेवटी तिला बेहेवियर मॉनिटर सिस्टिम ने मार्क केले आणि अश्या लोकांना त्वरित सीझ करायच्या ऑर्डर निघतात. 

पण आता काय उपयोग अंजलीला माहिती आहे कि आता इरा आपल्या भेटणार ते फक्त ऑनलाईन स्टेटस अपडेट्स मधून ...इतर सीझ झालेल्या लोकांप्रमाणेच इरा नावाचा काम्पुटर बॉट कुठल्यातरी सर्वर वर एव्हाना क्रिएट झाला असेल आणि त्याने इराचे पुढचे सगळे आयुष्य प्लॅन करून ठेवले असेल ... आता हे सगळं इराच्या बाबांना सिद्धेशला कसे सांगायचे या विचारात हातात फुग्यांचा गुच्छ घेऊन अंजली जिना उतरू लागते अन अंजलीचा फोन बझ होतो "इरा जस्ट चेकड इन ऍट ७डी वर्चुअल वर्ल्ड ऑफ बॉलीवूड लोणावळा" ….


- विश्वेश 

शनिवार, ३१ डिसेंबर, २०१६

जगण्यावर जीव जडावा

जगण्यावर जीव जडावा
==============


कातरवेळी तूझ्या समीप
शब्द मनातून अलगद उतरावा
रात्र कविता होऊन जावी
अन जगण्यावर जीव जडावा

खिडकीबाहेर सागर गहिरा
तुझ्या पाऊली स्पर्शून जावा
वाळूबरोबर मनही रुपेरी
अन जगण्यावर जीव जडावा

माळून घेता ओलेत्याने
पाचू मरवा बहरून यावा,
गंध पसरावा रंध्रातूनी
अन जगण्यावर जीव जडावा

लिहिले  मी कालही,
आजही लिहितोच आहे,
त्या लिहिण्याला अर्थ मिळावा,
अन जगण्यावर जीव जडावा ...

- विश्वेष

सोमवार, ६ जुलै, २०१५

समुद्र

एकट्याने समुद्रावर जायची भीती वाटते आताशा

पूर्वी पायाशी येउन घोळणारा तो,
आता उगाच कोरड्या झालेल्या मला भिजवेल
अन निमूट माघारी वळणाऱ्या पायांना थिजवेल …
एकट्याने समुद्रावर जायची भीती वाटते आताशा

माझ्यावर सोडलेली त्याची ती जालीम लाट,
उगाच आणलेले उसने आवसान जाताना पुसत जाणार
अन घट्ट रुतलेल्या पायांचाही पुन्हा पुन्हा तोल ढासळणार
एकट्याने समुद्रावर जायची भीती वाटते आताशा

पसरला आहे मिट्ट काळोख चहूकडे,
हल्ली सूर्याबरोबर बहुदा तो रात्रीचे तारेही गिळतो,
अन दूरवर ते लाईट हाउस अन इथे मी दोघेच रात्रभर जळतो ….
एकट्याने समुद्रावर जायची भीती वाटते आताशा

- विश्वेश 

सोमवार, ९ डिसेंबर, २०१३

कॅनव्हास

गेले अनेक दिवस
तुझे नि माझे रंग
एकमेकात मिसळतो आहे मी …

मला माहिती नव्हते
कि सगळे रंग एकत्र आले
कि बनतो तो काळा रंग …

आता चाचपडतो आहे
त्या अंधारात शोधत
तुझे नि माझे ते पूर्वीचे रंग …

तुझ्या डोळ्यांचा निळा
तुझ्या अधरांचा गुलाबी
अन तुझ्या हातातल्या गुलमोहराचा लाल …

खूप वेळा पुसायचा प्रयत्न केला
स्वताला, स्वताच्या रंगांना
पण, सगळे इतके गडद झाले आहे कि …

पुसताना भीती वाटते आता,
कॅनव्हास  फाटण्याची … किंवा
पुन्हा पांढरा पडण्याची …

 - विश्वेश

सोमवार, ९ सप्टेंबर, २०१३

गणपतीचे दिवस !

आज सकाळी नेहमीची धावपळ चालू असतांना घरात नवीनच आलेल्या बाप्पांनी हाक मारली "अरे कसली एवढी घाई … ?"
"अरे तुझं बर आहे बाप्पा, तुला आता १० दिवस नुसती ऐश करायची आहे … मोदक, पेढे, मखर, आरास … आम्हाला काम आहे … बॉस आहे तिकडे … " मी पोराचे शाळेचे दप्तर भरता भरता उत्तरलो…
"बर बर … मग आज आमचे छोटे उस्ताद … तुमचे चिरंजीव तरी … " बाप्पा काय विचारणार याचा अंदाज आल्याने मी वेळ न दवडता लगेच म्हणालो "छे आज त्याच्या शाळेत गणपती फेस्टिव्हल चे सेलिब्रेशन आहे. बघितलं नाहीस का, एथनिक वेअर, खाऊचा डबा … आणि हो तू विचारायच्या आत सांगतो गृहलक्ष्मी ला सध्या कंपनीमध्ये फार काम आहे … रिलीज चालू आहे त्यात गौरीला हाल्फ-डे घेतलाय आणि विसर्जन नेमकी शुक्रवारी आले असल्याने तिची पंचाईत झाली आहे …" बोलता बोलता पोराचे दप्तर भरून तयार झाले.

पटकन समयीतल्या कालच्याच वाती लांबवल्या तेल रिफील केले, पोराच्या हाती घंटी दिली आजी आजोबांना समजले कि आरतीची वेळ झाली, ते हि रांगेत येउन उभे राहिले अन आरती सुरु झाली. नेहमीपेक्षा अंमळ जास्त वेगात अन "स्मरणे मात्रे मन" गाळून पटकन आरती उरकली, काका हलवाई कडून आणलेले फ्लेवर्ड पेढे प्रसाद म्हणून टेकवले. बायकोने कालच्या प्रसादाचा काला (विविध लोकांकडून, सोसायातीमधून वगैरे आलेल्या आणि घराच्या उरलेल्या प्रसादाचे मिश्रण) एका डब्यात भरून दिला आणि आम्ही निघालो.

"अरे काहीतरी चमचमीत आण संध्याकाळी प्रसादाला, गोड खाऊन खाऊन कंटाळा आला, त्या काका हलवाईच्या मटार करंज्या … बघ म्हणजे जमले तर  … आणि हो …" बाप्पा पुन्हा बोलू लागले
आधीच घाई, त्यात बाप्पा पुन्हा अजून वेळ खाणार म्हणून मीच आधी क्लियर केले , "आ(जो)बा, तुम्ही सांगा हो बाप्पाला किती बिझी श्येडूल असते वीकडे चे, बाप्पा ते प्रसादाचे वगैरे  डिपार्टमेंट आजी आबांचे असते. चलो बाप्पा संध्याकाळी भेटू … " असे म्हणून काढता पाय घेतला.

एव्हढे सगळे करून मी आणि बायको आपापल्या कंपनीत, पोरगा शाळेत (नटून थटून) वेळेवर पोचल्याने मनातल्या मनात बाप्पा मोरया म्हणत नेहमीच्या टपरीवर चहाचा पहिला घोट घेतला …

आता १० दिवस घरी आजी आबांची मजा आहे, वेळ घालवायला नाही म्हंटले तरी अजून एक पाहुणा आहे असे म्हणत मी फेसबुकवर ४-५ मित्रांचे घरगुती गणपतीचे फोटो लाईक केले.

- विश्वेश

रविवार, २८ एप्रिल, २०१३

दोन दिवस


माझ्या सर्व कर्जबाजारी मित्रांकरिता  - (स्पेशली होम लोन वाले)
-------


दोन दिवस भाड्यात गेले, दोन दिवस हफ्त्यात गेले
हिशोब करतो आहे आता पैसे किती हे खात्यात उरले !

शेकडो वेळा पगार आला, आशा फुलल्या, मनं धुंद झाली
घराच्या खिडकीतून चंद्र बघण्यातच जिंदगी बर्बाद झाली

नोकरी हेच माझे सर्वस्व, कर्जाकडे गहाणच राहिली
कर्जापुढे मान न उंचावता, सदा कलम झालेली पाहिली

हरघडी एफड्या मोडल्या नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा एफड्याच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

कर्जाचा विचार हरघडी केला अगा कर्जमय झालो
कर्ज घ्यावे कसे, पुन्हा भरावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस भाड्यात गेले, दोन दिवस हफ्त्यात गेले.

- विश्वेशमूळ कविता - 

दोन दिवस

दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले.


कवी - नारायण सुर्वे


मंगळवार, २२ जानेवारी, २०१३

मळभ


पुढचे काहीच दिसत नसतांना धुक्यातून चालायची एक वेगळीच मज्जा आहे. आपल्या नकळत आपण आयुष्यात देखील बरेचदा असे अंदाजाने चालत असतो. पुढचे दिसत नसते पण रस्ता ओळखीचा असला कि मनातून एक विश्वास असतो कि इच्छित स्थळी नक्की पोचू आपण, अन एक आशाही असते कि हे धुके सरेल. कधी कधी बराच काळ धुकं काही सरत नाही त्यावेळी ते धुके आहे कि मळभ हे ओळखता आले पाहिजे.  या मळभाची सवय होऊ देता कामा नये, नाहीतर आभाळाचा निळा रंग करड्यात मिसळायला वेळ लागत नाही मग आयुष्यातला करडा रंग हळू हळू गहिरा होऊ लागतो. 

धुकं आणि मळभ यातील फरक ओळखण्याकरीता लख्ख सूर्य प्रकाशाची गरज असते. 


बरेचदा आपण धुक्याला पाहून मळभ मळभ असे म्हणून ओरडतो अन हातपाय गाळून बसतो.  तुमच्या आयुष्यातला सूर्य तुम्हालाच शोधायचा असतो. एकदा का तो सापडला कि धुक्याची तमा बाळगू नये. मळभ दूर व्हायला मात्र एकदा तरी मनसोक्त बरसावे लागते त्याशिवाय ते सरत नाही.  त्यामुळे स्वेटर, छत्री, रेनकोट यासारखी निसर्ग-द्वेष्टि साधन वापरण्यापेक्षा मोकळे राहा, मनसोक्त भिजा उन्हातही अन पावसातही, थंडीतली थरथर काळजापर्यंत पोचुद्या ... 
कोणास ठाऊक अश्याने तुमच्या आयुष्यावरचे मळभ सरेलही कदाचित ...

सोमवार, २१ जानेवारी, २०१३

पुस्तक


आपण एखाद्या लांबच्या प्रवासाला निघालो आणि गाडीत बसलो कि राखून ठेवलेले एखादे पुस्तक काढतो वाचायला अन त्याच वेळी आपला शेजारी देखील त्याचे पुस्तक काढतो तेव्हा आपले लक्ष आपल्या पुस्तकापेक्षा त्याच्या पुस्तकात डोकावण्यात जास्त असते. 

नवरा बायकोचे पण तसेच असते काहीसे असे मला वाटते. म्हणजे दोघेही आपापली पुस्तक वाचत असतात पण दुसर्याच्या पुस्तकाबद्दल एक आकर्षण, ओढ आणि हळू हळू हक्क वाटू लागतो. आपण त्यात डोकावू लागतो, मग स्वताच्या पुस्तकामाधली पानं कधी सवयीने तर कधी दुसर्याला कळू नये म्हणून तर कधी आपोआप उलटली जातात.  संसारात खरी मज्जा तेव्हा आहे जेव्हा दोघेही एकच पुस्तक वाचाल. एकाच सुखी शेवटाच्या ओढीने ... मग आपोआपच दुसर्याचे वाचून होईपर्यंत थांबणे, एखाद्या विनोदाला दोघांनी एकत्र हसणे, एखाद्या गहीवरणाऱ्या प्रसंगी हात हातात घट्ट धरणे ह्या सगळ्याची मजा येते.

आज अनेक नवरा बायको आपापली वेगळी पुस्तके वाचत आहेत, आपापल्या गोष्टीमध्ये रममाण आहेत. मग ते मधेच खुदकन हसणे, डोळ्यांचे ओलावणे हे सगळे त्याला अनोळखीच ना ... कारण त्यावेळी तो दुसर्याच गावी ... त्याच्या त्याच्या पुस्तकात मग्न ... दोन्ही पुस्तकांचे शेवट गोड असतीलही कदाचित पण ते एकटयानेच चाखायचे यात काय सुख. त्याच्या किंवा तिच्या पुस्तकात डोकावून तर बघा आवडेल तुम्हालाही ते कदाचित. हळूहळू त्या   पुस्तकाबद्दलची ओढ कमी होण्याच्या आत तुमचे पुस्तक बदला. मग दोघांना एकाच गोष्टीची ओढ, एकसारखी हुरहूर अन दोघांची वाटचाल एकाच सुखी शेवटाकडे असेल.

बर हे पुस्तक संपले तरी दोघांकडे एकसारख्या आठवणी असतील ... चर्चेला दोघांच्या आवडीचा विषय असेल आणि यातूनच संवाद वाढेल. संवादाला लय प्राप्त झाली कि त्याचा सुसंवाद होतो. आणि यासारखे सुरेख जीवनगाणे नाही.

तेव्हा एकदा वाचून बघा एखादे पुस्तक एकत्र ... 
तुमचा लांबचा प्रवास सुखकर होईल हे नक्की ...


ता. क. - फार 'पुस्तकी' आहे पण पहिल्यांदाच असे काही लिहित असल्याने चू.भू.द्या.घ्या.

बुधवार, २ जानेवारी, २०१३

प्रतिज्ञा


प्रतिज्ञा 
--------
फेसबुक माझा देश आहे।
सगळे फेसबुकीय माझे मित्र आहेत।
माझ्या प्रोफाईलवर माझे प्रेम आहे।
माझ्या फेसबुक वरील समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या अपडेट्सचा मला अभिमान आहे।
माझे स्टेटस अपडेट्स जास्तीत जास्त जण (मुली) लाईक करतील हि पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या पालकांना , गुरुजनांना 
आणि वडीलधार्‍या माणसांना माझ्या प्रोफाईल पासून लांब ठेवीन
आणि प्रत्येकाचे पोस्ट लाइक करेन ।
माझे फेसबुक  आणि माझे फेसबुक-मित्र 
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे स्टेटस अपडेट्स आणि
त्यांचे बहुढंगी फोटो पाहण्यातच माझे
सौख्य सामावले आहे।


जय टाईमपास ! जय फेसबुक !

सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१२

मी आयफोन-कर


तुम्हाला कोण व्हायचे आहे आयफोन-कर, एनड्रोइड-कर कि विंडोज-कर 


... आता तुम्हाला आयफोन-कर व्हायचं का? जरूर व्हा. आमचे काही म्हणणे नाही. पण मुख्य सल्ला असा, की पुन्हा विचार करा अगदी आग्रहच असेल, तर मात्र कंबर कसून तयारी केली पाहिजे, आणि एकदा तयारी झाली, की त्या सारखी मजा नाही ,तुम्हाला सांगतो.
पहिली गोष्ट म्हणजे- कसलाही न्यूनगंड बाळगू नका. आणि प्रत्येक फोन च्या फिचर वरून मतभेद करायला शिका. म्हणजे आपल्या फोन मध्ये आहे का, आपल्या फोनमधील फिचरचा  दर्जा काय, एकूण उपयोग काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं. म्हणजे आता "स्मार्ट-फोन खरा कसा असला पाहिजे?" या विषयावरती, आपण फ़क़्त फोन करणे, लघु संदेश करणे इतकाच फोन वापरता, हे विसरून मत ठणकावता आले पाहिजे.  स्मार्ट-फोन खरा कसा असला पाहिजे? - ठोका.
दिवसातून एकदा तरी "स्टीव जॉब्स होता तेव्हा ..." हे म्हणायलाच पाहिजे. हे वाक्य म्हणायला वयाची अट नाही. इथे म्हणजे दहा वर्षाचा मुलगा सुद्धा चाळीशीच्या अनुभवाचे गाठोडं असल्यासारखं ते चारचौघांपुढे उघडत असतो. त्यामुळे "च्यायला, स्टीव जॉब्सच्या वेळी हे असलं नव्हतं" हे वाक्य कॉलेज, ऑफिस, दुर्गा, के एफ सी, सी सी डी,  आणि युरो किड्स, कुठेही ऐकायला मिळेल, "स्टीव जॉब्सच्या वेळी ते तस नव्हतं!"
आयफोन-कर व्हायला कसल्यातरी गोष्टीचा जाज्ज्वल्य अभिमान हवा- नुसता नाही, जाज्ज्वल्य अभिमान. मग तो अगदी स्टीव्ह जॉब्स चा, किंवा एपल चाच असला पाहिजे असे काही नाही. म्हणजे आपण आयफोन किती महाग घेतला, किती वेळ रांगेत उभे होतो, सीम कार्ड कसे कट केले ह्या पर्यंत कुठल्याही गोष्टीचा असला तरी चालेल. पण जाज्ज्वल्य अभिमान हवा. मतभेद व्यक्त करायला या जाज्ज्वल्य अभिमानाची फार मदत होते. म्हणजे ब्लू-टूथ किवा डाऊनलोडच्या ऐवजी, आय-ट्युन्स मधून उगाच गाणी विकत घेणे, वायरलेस सिन्क सतत करणे, एस डी कार्ड च्या ऐवजी आय-क्लाऊड वर गोष्टी ठेवणे - अशी त्या त्या अभिमानाची नीट वाटणी करता येते आपल्याला. आपला मतभेद केवळ खासगी मध्ये व्यक्त करून आयफोन-कर थांबत नाहीत. अधून मधून फेसबुक वर, आपल्या ब्लोग वर आयफोन बद्दल स्तुती लिहावी लागते इतर ओ एस चा अपमान करावा लागतो. इमेल ला मुद्दाम "सेंट फ्रॉम आयफोन !" अशी स्वाक्षरी द्यावी लागते. त्यासाठी लेखनाची स्वातंत्र्य शैली कमवायची, हे अत्त्यंत आवश्यक आहे.

थोडक्यात म्हणजे आयफोन-कर व्हायचं असेल, तर म्हातारपणा पर्यंत सगळे सोफ्टवेअर आणि अभिमान विकत घेऊन वापरणाच्या दिशेने वाटचाल करायच धोरण सांभाळावे लागते.

बुधवार, ७ नोव्हेंबर, २०१२

सेतु : मी (अनुवाद)सेतु : मी (अनुवाद)
=====


खोल घाटांतून ...

उंच शिखरांकडे 
ज्याला जायचे होते तो तर गेला -
हाय माझ्या शिरी पाय रोवून 
माझ्याच बहुपाशातून ...
इतिहास तुला घेऊन गेला 

ऐक कान्हा, ऐक 

का मी फ़क़्त एक सेतू होते तुझ्यासाठी 
लीलाभूमी आणि युद्धभूमी मधील  
दुस्तर काळ जोडण्यापुरती!

आता या सुन्या शिखारांत, मृत्यू-घाटात 

सोन्याच्या पातळ तारांनी गुंफलेल्या पुलासारखे 
निर्जन 
निरर्थक 
कंपणारे, विसरलेले, उरलेले माझे हे सेतू-शरीर 

ज्याला जायचे होते तो तर गेला


- धर्मवीर भारती (स्वैर अनुवाद - विश्वेश)


मंगळवार, ६ नोव्हेंबर, २०१२

शब्द - अर्थहीन (अनुवाद)प्रसंग - राधा कृष्णाला जाब विचारते कि तू मला का सोडून गेलास, त्यावर कृष्ण तिला बरेच समजावू पाहतो, कर्म, धर्माच्या गोष्टी सांगतो 

त्यावर राधाचे उत्तर -


शब्द - अर्थहीन 

==========हि सार्थकता तू 

मला कशी समजावणार ...

कान्हा ...


शब्द शब्द शब्द 

माझ्या करता सगळे अर्थहीन असते,

जर ते माझ्या समीप बसून 

माझ्या निर्जीव कुंतलात हात गुंफून 

तुझ्या कापऱ्या ओठांतून आले नसते ...

शब्द शब्द शब्द 


कर्म, स्वधर्म, निर्णय, दायित्व ....

मी देखील घरो घरी ऐकले आहेत हे शब्द 

अर्जुनास यात काहीही सापडो ...

मला बापडीला यात काही सापडत नाही प्रिया ...

मी फ़क़्त त्यांच्या मार्गात अडखळून 

तुझ्या ओठांची कल्पना करत राहते,

ज्यातून तू पहिल्यांदा उच्चारले असशील हे शब्द ...


तुझे ते सावळे मनोहर रूप 

किंचित वळलेली शंखाकृती मान 

माझ्या दिशेने उठलेल्या चंदन-बाहू 

ती आपल्यातच मग्न अशी दृष्टी 

अन हळू हळू हलणारे ते ओठ ...


मी कल्पना करते कि 

अर्जुनाच्या जागी मी आहे 

आणि माझ्या मनात मोह निर्माण झाला आहे 

मला माहिती नाही कि हे कोणते युद्ध आहे 

मी कोणाच्या बाजूने आहे 

नेमका पेच काय आहे 

आणि युद्धाचे कारण काय आहे

पण माझ्या मनात मोह निर्माण झाला आहे 

कारण तुझ्याकडून समजावून घेणे 

मला फार आवडते 

आणि सैन्य स्तब्ध उभे आहे 

इतिहास स्थगित झाला आहे 

आणि तू मला समजावत आहेस ...


कर्म, स्वधर्म, निर्णय, दायित्व ....

शब्द शब्द शब्द 

माझ्या करता नितांत अर्थहीन आहेत हे -

मी ह्या सगळ्याच्या पलीकडे तुला पाहते आहे 

तुझ्या प्रत्येक शब्दाला

चातकासारखी पीत आहे 

आणि तुझे असाधारण तेज 

माझ्या शरीरातील रोमा रोमास 

सचेतन करीत आहे   


आणि तुझ्या ह्या जादूभर्या ओठांतून 

रातराणीच्या फुलासामान टप-टप शब्द झरत आहेत 

एका पाठोपाठ एक, एका पाठोपाठ एक ....

कर्म, स्वधर्म, निर्णय, दायित्व ....

आणि माझ्यापर्यंत येता-येता सगळे बदलून जात आहेत

मला ऐकु येते ते फक्त ...

राधे राधे राधे ...


शब्द शब्द शब्द 

तुझे शब्द अगणित आहेत कान्हा - अमाप 

पण त्यांचा अर्थ एकाच आहे -

मी

मी

फ़क़्त मी


मग आता त्या शब्दांनी 

मलाच 

इतिहास कसा समजावणार कान्हा ?


- धर्मवीर भारती (स्वैर अनुवाद - विश्वेश)मूळ कविता -
---------------

कनुप्रिया (इतिहास: शब्द – अर्थहीन) 

पर इस सार्थकता को तुम मुझे
कैसे समझाओगे कनु?
शब्द, शब्द, शब्द…….
मेरे लिए सब अर्थहीन हैं
यदि वे मेरे पास बैठकर
मेरे रूखे कुन्तलों में उँगलियाँ उलझाए हुए
तुम्हारे काँपते अधरों से नहीं निकलते
शब्द, शब्द, शब्द…….
कर्म, स्वधर्म, निर्णय, दायित्व……..
मैंने भी गली-गली सुने हैं ये शब्द
अर्जुन ने चाहे इनमें कुछ भी पाया हो
मैं इन्हें सुनकर कुछ भी नहीं पाती प्रिय,
सिर्फ राह में ठिठक कर
तुम्हारे उन अधरों की कल्पना करती हूँ
जिनसे तुमने ये शब्द पहली बार कहे होंगे
- तुम्हारा साँवरा लहराता हुआ जिस्म
तुम्हारी किंचित मुड़ी हुई शंख-ग्रीवा
तुम्हारी उठी हुई चंदन-बाँहें
तुम्हारी अपने में डूबी हुई
अधखुली दृष्टि
धीरे-धीरे हिलते हुए होठ!
मैं कल्पना करती हूँ कि
अर्जुन की जगह मैं हूँ
और मेरे मन में मोह उत्पन्न हो गया है
और मैं नहीं जानती कि युद्ध कौन-सा है
और मैं किसके पक्ष में हूँ
और समस्या क्या है
और लड़ाई किस बात की है
लेकिन मेरे मन में मोह उत्पन्न हो गया है
क्योंकि तुम्हारे द्वारा समझाया जाना
मुझे बहुत अच्छा लगता है
और सेनाएँ स्तब्ध खड़ी हैं
और इतिहास स्थगित हो गया है
और तुम मुझे समझा रहे हो……
कर्म, स्वधर्म, निर्णय, दायित्व,
शब्द, शब्द, शब्द…….
मेरे लिए नितान्त अर्थहीन हैं-
मैं इन सबके परे अपलक तुम्हें देख रही हूँ
हर शब्द को अँजुरी बनाकर
बूँद-बूँद तुम्हें पी रही हूँ
और तुम्हारा तेज
मेरे जिस्म के एक-एक मूर्छित संवेदन को
धधका रहा है
और तुम्हारे जादू भरे होठों से
रजनीगन्धा के फूलों की तरह टप्-टप् शब्द झर रहे हैं
एक के बाद एक के बाद एक……
कर्म, स्वधर्म, निर्णय, दायित्व……..
मुझ तक आते-आते सब बदल गए हैं
मुझे सुन पड़ता है केवल
राधन्, राधन्, राधन्,
शब्द, शब्द, शब्द,
तुम्हारे शब्द अगणित हैं कनु -संख्यातीत
पर उनका अर्थ मात्र एक है -
मैं,
मैं,
केवल मैं!
फिर उन शब्दों से
मुझी को
इतिहास कैसे समझाओगे कनु?

शुक्रवार, ६ जुलै, २०१२

पुन्हा पाऊस


ढग दाटता ... मन फाटता ...
पाऊस साठता ... फुटला टाहो ...
पुन्हा कोरड्यात ... मला न्याहो ...
पुन्हा कोरड्यात ... मला न्याहो ...

ह्या ओळी सुचल्या आणि त्या नंतर हि कविता झाली ...

पुन्हा पाऊस
========

आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ...
आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ...
 
चांगली उन्हाची सवय झाली होती ...
तो डबडबणारा घाम
ते काळवंडलेले शरीर
तो कोरडेपणा ... ती रखरख 
यांना चांगली लय आली होती ...
कुठून हे काळे ढग आले ... आता सगळ बेताल होणार ...
आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ...

आता पुन्हा तो ओलावा 
पुन्हा तो हिरवेपणा 
पुन्हा त्या कोरड्या डोंगरावर 
उमटणार झर्यांच्या रेघा ...
बुजणार पुन्हा ...
पडलेल्या त्या सगळ्या भेगा ...
पुन्हा नव्या आशेनी ... आता मन चल बिचल होणार ...
आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ...

पुन्हा एकट्याने भिजायचे 
पुन्हा एकटेच वाळायचे ...
असेच नित्य नियमाने 
स्वताला ओलेत्यानी जाळायचे ...
मग पावसाच्या पाण्यातूनच 
हळूच डोळ्यातून रक्त ... गाळायचे ...
आता फ़क़्त पाणीच नाही ... तर रक्त पण गढूळ होणार ...
आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ...

या वर्षी ... 
पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ...

- विश्वेश 

मंगळवार, ३ जुलै, २०१२

पाऊस


  पाऊस
======

पाऊस आला कि नेहमी आठवयाचीस तू ...
पावसाचे थेंब ओंजळीत साठवायाचीस तू ...
अन बेसावध एखाद्या क्षणी त्या ओंजळीत भिजवायाचीस तू ...

आता इतका सावध झालो ... 
कि उगाच कधीच भिजत नाही ...
कितीही आभाळ काळवंडले 
तरीहि मन तिथे थिजत नाही ...

आता पाऊस आला कि येते चीड ...
त्या गर्दीची ... त्या ट्राफिक ची ...
त्या चिखलाची ... त्या मातीची ...
त्या पाण्यात उड्या मारणाऱ्या पोराची ...
त्या रेडीओ वरच्या लताची ...

आणि सगळ्यात जास्त ... स्वताची ...

आता इतका सावध झालो ... 
कि मनातल्या त्या कोपर्यातली तू ...
बेसावध क्षणी भिजवशील ...

या भीतीने ... उगाच तिथे थिजत नाही ...

मी पावसाच्या आणि पाऊस माझ्या 
वाटेला आता जात नाही ....

- विश्वेश 

बुधवार, २७ जून, २०१२

आज कितीक दिवसांनी ...

आज कितीक  दिवसांनी ... 
तुझा तो सवयीचा स्पर्श ... 
अंग शहारून गेला ...
तुझा तो सवयीचा वास ...
मन सुगंधून गेला ...

आज कितीक दिवसांनी ...
तुझ्या नेहमीच्याच मोकळ्या केसात 
पुन्हा हरवले हात ..
तुझ्या नेहमीच्याच  लकबिंनी  
पुन्हा हलवले खोल आत  ... 

आज कितीक दिवसांनी ...
माझ्या कवितेला सापडलीस तू 
अन  तुला सापडली माझी कविता 

आज कितीक दिवसांनी ...
चाकोरीचा तोडून बांध 
भरून वाहिली भावनांची सरिता ...

आज कितीक दिवसांनी ...
पुन्हा तू ... तीच तू ...
अन पुन्हा मी ... नवा मी ...

- विश्वेश