गुरुवार, ९ जून, २०११

आज पहाटे


आज पहाटे, आळसावल्या मनात सखये उरला तुझाच बंध 
आज पहाटे, सुकल्या राताराणीस सखये उरला तुझाच गंध ...

आज पहाटे, सोडले शरीर अन भिरभिरले मन तुझ्याच मागे 
आज पहाटे, संपला शिशिर, फुलवितो वसंत नवस्वप्नांचे थवे

आज पहाटे, सरला काळोख, उजळले मन्मनात सोनेरी रंग
आज पहाटे, झालो वैरागी, अन झालो पुन्हा मोहरानात दंग    

आज पहाटे, पुन्हा एकदा, बोलले किती एरवीचे तुझे नयन मुके  
आज पहाटे, पुन्हा एकदा, दाटले डोळ्यासमोर वास्तवाचे धुके 

- विश्वेश

बुधवार, १ जून, २०११

आता नाही ...


सुचते बरेच काही, पण लिहिणे होत नाही ...
दिसते बरेच काही, पण पाहणे होत नाही ...

छळते तुझीच साद, सखे पण येणे होत नाही ...
साठवले बरेच काही, पण देणे होत नाही ...

तुझ्या घरावरून सखे , हल्ली जाणे होत नाही
पूर्वीची ती युगुलगीते, आता गाणे होत नाही ...

स्वच्छंद मनस्वीतेने आता जगणे होत नाही 
जाहलो भ्याड इतका आता मरणे होत नाही ... 

- विश्वेश 

कावळे ...

पाहावे तिथे फ़क़्त दिसतात कावळे ... 
कुणी आंधळे तर कुणी पांगळे 

अरे हीच मायभूमी जिने दिले मावळे ... 
चालती अनंत भक्त पाहण्या रूप सावळे 
नुकताच मेलो आहे मी, आहे पिंड कोवळे ... 
पाहावे तिथे फ़क़्त दिसतात कावळे ...


जगताना छळले तुम्ही मेल्यावरही छळा
माणसाचा नाही तुम्हा फ़क़्त पिंडाचा लळा
वाटले होते मेल्यावर तरी संपेल सगळे 
पाहावे तिथे फ़क़्त दिसतात कावळे ...

काढली अनेकदा जगताना स्वत्वाची धिंड 
मोडला अनेकदा जगताना माणुसकीचा पिंड 
सार्यातून उरला गाठीशी तो स्वाभिमान थोडा 
तोडा लेकहो तुम्ही त्याचेही लचके तोडा

माझ्या कुचकामी पिंडाच्या नैविद्याला 
आलात बीभत्सतेचे नेसून सोवळे 
पाहावे तिथे फ़क़्त दिसतात कावळे ...


- विश्वेश