बुधवार, १ जून, २०११

कावळे ...

पाहावे तिथे फ़क़्त दिसतात कावळे ... 
कुणी आंधळे तर कुणी पांगळे 

अरे हीच मायभूमी जिने दिले मावळे ... 
चालती अनंत भक्त पाहण्या रूप सावळे 
नुकताच मेलो आहे मी, आहे पिंड कोवळे ... 
पाहावे तिथे फ़क़्त दिसतात कावळे ...


जगताना छळले तुम्ही मेल्यावरही छळा
माणसाचा नाही तुम्हा फ़क़्त पिंडाचा लळा
वाटले होते मेल्यावर तरी संपेल सगळे 
पाहावे तिथे फ़क़्त दिसतात कावळे ...

काढली अनेकदा जगताना स्वत्वाची धिंड 
मोडला अनेकदा जगताना माणुसकीचा पिंड 
सार्यातून उरला गाठीशी तो स्वाभिमान थोडा 
तोडा लेकहो तुम्ही त्याचेही लचके तोडा

माझ्या कुचकामी पिंडाच्या नैविद्याला 
आलात बीभत्सतेचे नेसून सोवळे 
पाहावे तिथे फ़क़्त दिसतात कावळे ...


- विश्वेश