शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०११

भाव ...


असण्यास भाव नाही ... तुझ्या नसण्यास भाव आहे ...
हसण्यास भाव नाही ... तुझ्या आसवांस भाव आहे ...

नकळत वाहात आलास इथे, हे ओळखीचे गाव आहे ...
बुडविले तुला जीवानिशी ... ती ओळखीची नाव आहे ...

तू शोधतो ज्या सुखाला ... त्याचा कुणा ठाव आहे ...
फसवू नकोस स्वताला ... इथे जगणेच साव आहे ...

चढण्यास नवी शिखरे ... तू घालतो कुणावर घाव आहे ...
वरच्या दरबारात मनुजा ... न रंक न कोणी राव आहे ...

तू मोजतो आहेस वर्षे ... तुला जगण्याची हाव आहे ...
इथे मरणास भाव नाही ... पण सरणास भाव आहे ... 
इथे सरणास भाव आहे ...

- विश्वेश 



गुरुवार, २९ सप्टेंबर, २०११

एक तो अन एक ती ...


मी शोधतो आहे एक तो अन एक ती ...
बर्याच वर्षांपूर्वी ह्या इथेच दिसायचे ते 
दिलखुलास एकत्र रडायचे अन हसायचे ते ...
न चुकता पहिल्या पावसात भिजायचे ते ...
गर्दीतहि स्वतापुरते वेगळे असायचे ते ... 

मी शोधतो आहे एक तो अन एक ती ...
तो तिला रोज घरी सोडायला जायचा ...
कित्येक वेळ नंतर तिथेच घुटमळायचा ...
तिची खिडकीतली लाजरी नजर टाळायचा ...
अन त्याच चोरट्या नजर भेटीवर भाळायचा ...

मी शोधतो आहे एक तो अन एक ती ...
तिला आवडतात म्हणून तो कविता करायचा ...
कुठल्याश्या बहाण्याने तो तिचा हात धरायचा ...
तिच्या हळू हळू हात सोडवून घेण्यावर मरायचा ...
अन त्याच भावना पुन्हा कागदावर उतरवायचा ...

मी शोधतो आहे एक तो अन एक ती ...
परवा पुन्हा तश्याच पावसात मनसोक्त भिजलो ...
धगधगत होतो किती दिवस तेव्हा खरा विझलो ...
त्यांच्या ठरलेल्या त्या जुन्या ठिकाणी तडक निघालो ...
पाहुनी लांबूनच तिला ... तिथे ... पुन्हा मागे फिरलो ...
पाहुनी लांबूनच तिला ... तिथे ... पुन्हा मागे फिरलो ...

तेव्हापासून अजूनही ...
मी शोधतो आहे "माझ्यातला एक" तो 
अन ती शोधते आहे "तिच्यातली एक" ती ...

- विश्वेश 

रविवार, ११ सप्टेंबर, २०११

बाप्पा मोरया


काल रात्री अचानक मला स्वप्न पडले नवे ...
बाप्पा आले आकाशातून म्हणे पाहायचेत तुमचे देखावे ...

बाप्पा म्हणाले चल जरा दिल्ली मुंबईला जाऊ 
मस्तपैकी कोर्टातले संसदेतले तुमचे फटाके पाहू 
बाप्पा... ते फटाके नाहीत आहेत बॉम्ब जीवघेणे 
त्यापेक्षा दाखवतो तुम्हाला अजंठा वेरूळ चे लेणे ...

बाप्पा म्हणाले परवाच तो जीजस भेटला होता ...
दहा वर्षापूर्वीच्या आठवणींमध्ये भलताच त्रस्त होता
मी म्हणालो त्याला अरे आमच्या भारतामध्ये बघ ...
काल स्फोट झाला तरी आज नाचतंय सांर जग ...

आमच्याकडे बॉम्ब हल्ल्यांचे आता सण साजरे होतात 
भांडवल करून त्याचे,  नवीन तारे जन्मास येतात 
इथे कोणाला पडले नाही, ह्यात कोण अन किती मरतात
जीजसा, बॉम्ब हल्ल्यांना आता इथे फक्त अतिरेकी घाबरतात 

जीजस म्हणाला असे कसे परवाच पहिला मी तुमचा लढा 
तुमच्या एकट्या अण्णाने दिला भ्रष्टाचाराच्या वृत्तीस तडा 
जीजसा, असा लढा संपायला सरकारी ज्यूसचा एकच घोट पुरतो 
अन अश्या अण्णाचा विसर पडायाला आम्हाला एकच स्फोट पुरतो ...

बाप्पा, मग तू हलव सगळ्यांना अन उभा रहा त्यांच्या पाठीशी 
मी लाख उभा राहीन रे, पण लढायचे बळ कुठे आहे गाठीशी 
जीजसा, इथे प्रत्येकाने ठरवले आहे, मागे वळून नाही बघायचं ...
अन स्फोटात आपण मरत नाही, तोवर आपल्यापुरतं जगायचं ...

खाडकन जागा झालो अन समोर पाहतो तर काय 
साक्षात बाप्पा समोर उभे, म्हणाले "असा बघतोस काय?" ...
बाप्पा तुम्हीच दाखवा मार्ग तुम्हीच करा उपाय 
हे ऐकून मात्र त्यांनी हळूच घेतला काढता पाय 

एवढेच म्हणाले बाप्पा शेवटी घेताना माझा निरोप ...
स्वप्न कसली बघता साल्यांनो उडवून माझी झोप ...
स्वप्न कसली बघता साल्यांनो उडवून माझी झोप ...

- विश्वेश