त्रैराशिक
जगण्याचे त्रैराशिक मांडण्याचा प्रयत्न आणि त्याला फुटलेली वाचा ...
सोमवार, १० ऑक्टोबर, २०११
तू ...
तुझे काजळ
घाली मोहोळ
काया कातळ
भासे मृगजळ
सौंदर्य नितळ
सरली मरगळ
भावना कुरळ
जशी हिरवळ
करुनी ओंजळ
झेलले वादळ
आसांचे वर्दळ
घाली गोंधळ
तुझाच दरवळ
घालतो भुरळ
अशी
आलीस जवळ
आता
अंतर अडगळ
आता
अंतर अडगळ
- विश्वेश
काहिली ...
नजर तुझी सखये वैखरी जाहली
जीवाची पुन्हा काहिली काहिली
पुन्हा भावनांची चिता जाळली
उरली सारी स्वप्नं झाकोळली
उभ्या आयुश्यि आता चढे काजळी
जीवाची पुन्हा काहिली काहिली
कुण्या अंगणीची तू फुले माळली
न कळे कशी तू सप्तपदी चालली
नको जीवघेणा खेळ भातुकली
जीवाची पुन्हा काहिली काहिली
गाठीशी फ़क़्त तुझी स्पंदने राहिली
जीवाची पुन्हा काहिली काहिली
- विश्वेश
सोमवार, ३ ऑक्टोबर, २०११
जीर्णोद्धार
सुन्या आयुष्यास उरला ...
तुझ्या आठवांचा आधार
पुन्हा करतो आहे मीच ...
जुन्या जखमांचा जीर्णोद्धार
मन-मंदिरात गंधाळलेल्या ...
विझल्या सगळ्याच वाती
तुजविण झालेल्या अंधारात ...
उरल्या भकास एकल्या राती
केलास हिशेब सहज अन ...
चुकले गणित जगण्याचे
उरले गाठीशी सखये आता ...
नुसते आभास आसवांचे
आता अंधाराचे नाही सखये ...
वाटते मज उजेडाचे भय
अन श्वासाश्वसास माझ्या ...
आता लागली भैरवीची लय
अखेरचे हे गाणे (गाऱ्हाणे) माझे ...
सखे फ़क़्त तुझ्याच साठी
घेऊन जातो दुख्खे भरून ...
सुखी रहा तू माझ्या पाठी
सुखी रहा तू माझ्या पाठी
- विश्वेश
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)