गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०१०

भार ...

तुझ्या मनी विचारांचे काहुर माजता,
त्याचे पडसाद दिसती माझ्या मुखावर

तुझ्या श्वासाश्वासात असे माझा प्राणवायु,
तुझे हे जगणे करी मजला दीर्घायु

माझ्या मनी विचारांची खळबळ माजता,
तुझ्या मुखातून झिरापते माझीच कविता

तुझ्या आनंदात माझे स्मित दडे,
तुझ्या प्रसन्नतेत माझा उत्साह ओसंडे

तुला वाटते दोन देहांची गरज न काही,
भार एकाचाही मज सहन होत नाही

मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०१०

बेत

कविवर्य सुरेश भटांच्या ह्या ओळींवरून प्रेरणा मिळाली -


मनाप्रमाणे जगावयाचे किती छान बेत होते...
नकळत आयुष्य मात्र वेगळीच वाट चालत होते
सापडला किनारा म्हणून जरा विसावलो ...
तर ते मृगजळ मला पाहून हसत होते

भेदरलो शोधू लागलो परतीची वाट
चाचपून पहिला आधारासाठी धरलेला हात
तो हात बहुदा कधीच सुटला
अन एकाकीपणाच्या नुसत्या जाणीवेने काळजाचा ठोका चुकला ...

घातली साद त्या दिलाबरास पुन्हा पुन्हा
उमगले नाही काय घडला गुन्हा ...
वाटले संपवावे हे जीवनाचे समर तितक्यात ....
दूरच्या मशिदीत घुमले अल्लाहू अकबर


कुठे राहिले समाधान

मला पुन्हा एकदा लहान व्हायचे आहे ..
मला पुन्हा एकदा चिंब भिजायचे आहे ...

पुन्हा चोरायचा आहे डब्यातून लाडू,
पुन्हा विनवायचे माळ्याला 'एकच कैरी पाडू' ?

पुन्हा रंगवायचे आहेत हात ... निळे शाईमध्ये
पुसायचे हात शर्टाला ... खेळायच्या घाईमध्ये

पुन्हा धरायचा हट्ट कुत्राच्या पिल्लासाठी,
आणि चोरायचे मावळे ... आपल्या किल्ल्यासाठी

पुन्हा घालायची शिळ तिच्याकडे पाहून ..
थांबायचे पाहत ... ती पाहते का वळून ...

पुन्हा जायचे पार्किंग मध्ये चुकवून नजरा ...
पळून जायचे ठेवून तिच्या गाडीवर गजरा ....

होते स्वप्न व्हावे मोठे ... कधी नसावे लहान ...
वाटे जिंकुनिया जग व्यापावे पंचप्राण
आता उमगत नाही ... कुठे राहिले समाधान... कुठे राहिले समाधान...


बुधवार, ३ नोव्हेंबर, २०१०

Agile Life Management - Generation Gap

Prerequisite -Agile(SCRUM) ची तोंड ओळख आणि SDLC चे न्यान.

Project Management चे हे दोन प्रकार आहेत - SDLC आणि Agile (त्यातले specific SCRUM) ह्या बद्दल जास्त माहिती इथे वाचा -


मूळ मुद्दा ह्यांच्यावर बोलणे नाही परंतू काही महिन्यांपूर्वी मी Certified SCRUM Master झालो तेव्हा माझी ओळख SCRUM शी झाली. आणि त्या दिवशीपासून मला SDLC आणि SCRUM हे केवळ प्रोजेक्ट करता वापरल्या जाणाऱ्या प्रणाली नसून आपल्या आयुष्याशी बरेच साम्य वाटले.

माझ्या आई वडिलांच्या generation ने आयुष्यभर SDLC वर प्रेम केले. साचेबद्ध आयुष्य जगले प्रत्येक गोष्टीचे आधी Requirement Analysis केले, Design केले, Execution केले. आयुष्यातल्या प्रत्येक लहान आणि मोठ्या आनंदाचे, celebration चे, सणांचे, कार्याचे, मुलांच्या शिक्षणाचे, त्यांच्या लग्नाचे planning केले, budgeting केले. आजही माझ्या वडिलांना त्यांच्या १० वर्षापूर्वीच्या पगाराचे break-up माहिती आहे, basic किती ? hra किती ? etc. मला माझ्या आजच्या पगाराचा फ़क़्त in hand माहिती आहे. साहजिक आहे... वडिलांच्या पगाराच्या प्रत्येक रुपयावर देणेकर्याचे किवा इंदिरा विकासचे नाव लिहिले होते. मला अजून आठवते, माझी आजीचा अगदी ४ वर्षापूर्वीपर्यंत (म्हणजे जिवंत असे पर्यंत) महिन्याचा औषध कोटा ठरलेला असायचा pension मधला.

आणि आज माझी अवस्था अशी आहे कि रोजचा दिवस ढकलायचा ... रोजचे हिशेब जुळवायचे ... रात्री online balance चेक करायचा आणि उद्याचे उद्या बघू असे म्हणून झोपायचे. काही वर्षांपूर्वीपर्यंत (३-४ वर्षांपूर्वी) हे असे विकली चालायचे, म्हणजे week-end to week-end असा हिशेब असायचा. मग पगार वाढले, खर्च वाढले (खरं तर वाढवले), गरजा वाढल्या म्हणजे unexpected गरजा वाढल्या, planned गरजा त्यांच्या जागी होत्याच (home loan , LIC etc.). पण हळू हळू week चे दिवसांवर आलो. आणि हे फ़क़्त आर्थिक दृष्ट्या नाही तर सगळ्याच बाबतीत. अहो मला आठवते माझ्या आई बाबांचे भांडण झाले कि कधी कधी आठवडाभर अबोला असायचा. आजकालच्या पती पत्नीचे काय ... सगळे मिटवायचे झोपायच्या आत.. त्या च्या त्या दिवशी ... कारण शांत झोप आवश्यक आहे, दुसऱ्या दिवशीच्या लढाई साठी. उगाच झुरत झुरत रात्री काढायला वेळ नाही कि energy नाही. (आवश्यक नाही पण डोम्बिवली Fast चा ओपेनिंग सीन आठवून पहा, रोज तेच तेच दळायचे... म्हणजे जगायचे. आजकालच्या पिढीच अगदी असे झाले आहे आणि इतक्या पराकोटीला पोचले आहे कि आता त्यांच्या आयुष्यात surprises सुद्धा तीच असतात expected and predictable)

अजून काही प्रातिनिधिक उदाहरणे इथे लिहितो -

१. दिवाळी सोने खरेदी करण्यासाठी २ वर्ष आधीपासून दर मुहूर्ताला १ ग्राम सोने घेणे. गाडगीळ किवा नगरकरांकडे सुवर्ण संचय भिशी हि प्रत्येक गृहिणी ची ठरलेली Savings ची method होती. आज बरेच जण प्रयत्न करतात सुवर्ण संचय करायचा. दुसऱ्याच महिन्यात उरलेल्या सगळ्या महिन्यांचे PDC दिले जातात किवा काही extream केसेस मध्ये पैसे देखील तसेच मध्ये सोडून दिले जातात, कोण हजार दोन हजारचे हिशोब ठेवतो?

२. दिवाळी ची तयारी अगदी १५ दिवस आधीपासून आमच्या घरी असायची पूर्वी. घरी कंदील करणे, फराळ करणे, किल्ला करणे, फटक्याचे quotations आणणे (कुठे सगळ्यात स्वस्त आहेत वगैरे...) असे बरेच उद्योग आई वडील मागे लावून द्यायचे. आता दर वर्षी नवा कंदील तो पण ready made, फटके जवळच्या दुकानातून (कितीही महाग मिळाले तरी), plastic चा किल्ला (ह्या वर्षी मी ४०० रुपयांची प्रतापगड ची प्रतीकुती पहिली plastic ची) अहो कारण सुट्टी दोनच दिवस आहे. त्यातला एक दिवस jet lag मध्ये जातो. जसा आमचा प्रत्येक week-end जातो ना तसा.

३. माझ्या आईने सगळ्या आप्तेष्टांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, इतर महत्वाचे दिवस एका वहीत टिपून ठेवले आहेत आणि आता इतके वर्ष ती वहि refer केल्याने बरेचसे पाठ झाले आहेत, अजूनही मला आईकडून reminders येतात (तोंडी) कि अरे उद्या अमुक अमुक चा वाढदिवस आहे. मला सोडा पण माझी आई कोणाच्या लग्नाचा वाढदिवस असेल तर त्यातील नवऱ्याला हळूच आदल्या दिवशी फोन करून आठवण करून देते... उद्या लग्नाचा (कितवा वगैरे) वाढदिवस आहे. Height of planning. आम्हाला facebook, orkut, skype असल्या महाभागांनी आठवण करून दिली आणि अगदी वेळ, मूड सगळे जुळून आले आणि तिथेच reply/wish असे button असेल तर आम्ही करतो बुवा विष. कारण माहिती असते समोरच्यालाही इतके काही पडलेले नसते आपल्या शुभेच्छांचे.

अशी मी अनेक उदाहरणे जगतो आहे ... ती generation gap कि काय म्हणतात ना ते म्हणजे खरं फ़क़्त
Change in Life Management Methodology आहे.

आम्ही ह्या युगातील Certified SCRUM Master आहोत. काही लोक Daily Sprint मध्ये आहेत तर काही Weekly.

Just out of curiosity - तुमच्या आयुष्याची Sprint Cycle काय ?

मंगळवार, २ नोव्हेंबर, २०१०

श्री गणेशा - लिमिटेड माणुसकी

माणुसकी ... हे काय असते बुआ?

आज जेव्हा मला थोडी उसंत मिळाली तेव्हा उमगले कि चाकोरीबध्द आयुष्यामधून माणुसकीची गरजच संपत चाललेली आहे. स्वतःवरचा आंधळा आत्मविश्वास, देवावर अविश्वास असल्याचा गर्व, आधुनिक विचारसरणी (independent), तसल्याच आधुनिक कविता, कल्पना विश्वात नेवून भेसूर सत्य अधिक गडद रंगविणारे साहित्य, ह्या सगळ्यामुळे माणुसकीचा रंग फिक्कट पडत गेला ...

आणि मग मी रजनीकांत च्या रोबो चित्रपटाची कथा वाचली कुठल्याश्या ब्लोग वर, चित्रपट पाहण्याचे कष्ट आणि विषाची परीक्षा नको म्हणून. तुम्ही हसाल पण हीच माझी प्रेरणा आहे ह्या पहिल्या खरडीची.

मी आणि माझा रोबो :

आजची पिढी पहिली कि मला जाणवते खरच आज आपण अचाट शक्ती असलेले, असाध्य ते सध्या करणारे रोबो बनलो आहोत आणि बनवतो आहोत. (मी बनवतो हा शब्द मुद्दाम वापरला कारण अजूनही मला संभ्रम आहे कि आपण घडवितो कि बनवितो ?)
च्यायला पोरगा जन्माला आला कि वजन किती ... मग कोणाचे किती असते? ideal किती असले पाहिजे? मग कमी असेल तर काय? जास्त असेल तर काय ? पालथा कधी पडणार? रांगणार कधी? उभा कधी रहाणार? चालाणार कधी? बोलणार कधी? दात कधी येणार? आला बरका वर्षाचा वाढदिवस grand झाला पाहिजे, return gift काय आहे ? मग आतापासून त्याला social करा, घरी आई, आजी, आजोबा असले तरी पाळणाघरात ठेवा, हेच वय आहे शिस्त लावायचे, अहो स्वताच्या हाताने खाल्ले पाहिजे आता, potty training झाले नाही वाटत अजून ? playgroup मध्ये घाला आता, (शाळेतून updates) फार रडतो, डबा स्वताच्या हाताने खात नाही, sharing ची सवय नाही, चप्पल स्वताची स्वतः घालत नाही ...

मला प्रश्न पडतो आपण माणसाचे पोर वाढवत आहे कि रोबो तयार करत आहे ? जो पुढे जाऊन असेच चाकोरीबध्द independent आयुष्य जगेल, जगू शकेल ? (barely be able to survive)

असे असेल तर मला खरच माझ्या पोरामध्ये बाहेरून माणुसकी पेरता येईल का? (installation, plugin etc?)
अगदी चित्रपटात दाखवली आहे तेवढी नाही ... पण लिमिटेड ? लिमिटेड माणुसकी ?